मुंबईतल्या शिवतीर्थावर महायुतीची सभा झाली. या सभेत पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर आले. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय. यातच आज मुंबईतल्या शिवतीर्थावर महायुतीची जाहीर सभा झाली. या सभेत पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर आले. तसंच या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते.
विकसीत भारतात ड्रीम सिटी मुंबईचा रोल महत्त्वाचा…
या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून कसे आहात मुंबईकर असं म्हणत केली. विकसीत भारतात ड्रीम सिटी मुंबईचा रोल महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटंलय. आम्ही देशात अनेक कामं केली आहेत. देशात लवकरच बुलेट ट्रेन धावेल. आज देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. आज आमच्याकडे 10 वर्षांचा रिपोर्ट कार्ड तसंच पुढच्या 25 वर्षांचा रोडमॅप आहे. मात्र इंडिया आघाडीकडे जितके पक्ष तितके पंतप्रधान, तितक्या घोषणा, तितके घोषणापत्र असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीय.
मोदींनी धाडसी निर्णय घेतले…
या सभेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी असं म्हणत भाषणाची सुरुवात केली. तसंच पुढं बोलताना ते म्हणाले, “21 वर्षांनंतर आपण एकत्र आलो आहोत. शरद पवार, उद्धव ठाकरे हे सत्तेत येणार नाही त्यांच्यावर आपण का बोलतो. नरेंद्र मोदी होते म्हणून राम मंदिर झालं अन्यथा ते झालंच नसतं. इतक्या वर्षात 370 कलम रद्द झालं नाही, ते मोंदीनी करुन दाखवलं. मोदींनी ट्रिपल तलाक कायदाच रद्द केला. त्यामुळं देशातील सर्व मुस्लीम महिला समाधानी झाल्या. हे सर्वात धाडसी निर्णय आहेत.” पुढच्या पाच वर्षासाठी मी आपल्यासोबत असल्याचं राज ठाकरेंनी म्हणत महाराष्ट्राच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत. त्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, देशाच्या अभ्यासक्रमामध्ये मराठा साम्राज्याचा इतिहास शाळेत शिकवला जावा, छत्रपतींच्या गडकिल्ल्यांना पूर्वीचं वैभव प्राप्त करावं म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी, देशात अनेक रस्ते तुम्ही बनवले, पण मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा. तो आजही खड्ड्यात आहे. या देशाचं संविधान कधीच बदललं जाणार नाही. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे मुसलमान मदत करतात कारण त्यांना मागच्या 10 वर्षात डोकं वर करता आलं नाही. हे फक्त मुठभर आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले.
फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात…
या सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “शिवाजी पार्कवर बोलत असताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची गर्जना मला आठवते ते याच ठिकाणाहून बोलायचे माझ्या तमाम हिंदू भगिनी आणि मातांनो. पण याच शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीनं सांगितलं हे वाक्य चालणार नाही. तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी हे वाक्य बोलणं बंद केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणात हिंदुत्वाचे अनेक शब्द असायचे, पण उद्धव ठाकरेंच्या भाषणात बाप चोरला, शेंबडे, घाबरट असे शब्द येतात. पण आम्ही आमच्या भाषणात मुंबईच्या विकासाचे मुद्दे सांगतो. तुम्ही एकतरी मुंबईचा विकास दाखवा. या देशातील मतं कमी पडतात म्हणून आता पाकिस्तानची मदत घेतात. उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात.”
मोदींनी संविधान दिवस सुरू केला…
या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडत आहे. महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा अशी विनंती. एक नवीन पर्व सुरू करत आहोत. मोदी यांनी मागच्या 10 वर्षात जे विकासाचं काम केलं ते नक्कीच गौरवास्पद आहे. विरोधक विकासाला फाटा देण्याचं काम करत आहेत. मोदी यांचीच भूमिका सर्वसामान्य आहे. 10 वर्षात पंतप्रधान यांनी कधीही संविधान बदलण्याची भाषा केली नाही. उलट त्यांनीच संविधान दिवस सुरू केला.”