मुंबई- रोहित शर्माने धडाकेबाज फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले आणि मुंबई इंडियन्सचे आव्हान कायम ठेवले होते. पण रोहित बाद झाला आणि तिथेच मुंबई इंडियन्सचा संघ पराभवाच्या दिशेने झुकला. अखेर मुंबईवर अखेरच्या सामन्यातही पराभवाची नामुष्की ओढवली. लखनौ सुपर जायंट्सनं मुंबई इंडियन्सवर १८ धावांनी विजय मिळवत प्ले ऑफचे आव्हान कायम राखले आहे.
लखनौने मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत २१४ धावा फटकावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित आणि नमन धीर यांचा अपवाद वगळता अन्य कोणालाही झुंजार खेळी साकारता आली नाही आणि त्यांचा पराभव झाला. लखनौच्या संघाने या विजयासह आपले प्ले ऑफचे आव्हान जीवंत ठेवले आहे. लखनौने यावेळी मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. नमनने २८ चेंडूंत नाबाद ६२ धावा केल्या, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. लखनौच्या २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला झोकत सुरुवात करून दिली ती रोहित शर्माने. मुंबईची ३.५ षटकांत बीनबाद ३३ अशी स्थिती असताना पावसाचे आगमन झाले आणि काही काळ खेळ थांबवण्यात आला. पण त्यानंतर जेव्हा खेळ सुरु करण्यात आला तेव्हा षटकं आणि विजयासाठीच्या धावा यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
पावसानंतर मैदानात धावांचा वर्षाव केला तो रोहित शर्मा. रोहितने यावेळी २८ चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. पण मुंबईचे दोन फलंदाज झटपट बाद झाल्याचे पाहायला मिळाले. डेवाल्ड ब्रव्हिस २३ धावांवर बाद झाला, तर सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडता आला नाही. पण रोहित मात्र लखनौच्या गोलंदाजांचा चांगला प्रतिकार करत होता. पण लखनौचा फिरकीपटू रवी बिश्नोईने यावेळी चतुराईने रोहितला आपल्या जाळ्यात फासले आणि मुंबईला मोठा धक्का दिला. रोहितने यावेळी ३८ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६८ धावांची दमदार खेळी साकारली. रोहित बाद झाल्यावर कर्णधार हार्दिक पंड्या फलंदाजीला आला. त्याच्याकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण हार्दिक यावेली पुन्हा अपयशी ठरला आणि त्याला १६ धावांवर समाधान मानावे लागले.