
लांजा :- मुंबई – गोवा महामार्गावरील तालुक्यातील वाकेड घाटात यू आकाराच्या वळणावर भराव टाकून डांबरीकरण केलेल्या भागात रस्ता खचला आहे . यामुळे या मार्गावरील वाहतूक जुन्या मार्गावरून वळविण्यात आली. रस्ता खचलेल्या भागात भराव टाकण्याचे काम हाती घेण्यात आले.
वाकेड घाटातील यू आकाराचे वळण कमी करण्यासाठी डोंगर फोडून रस्ता तयार करण्यात आला आहे . या भागात रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे . काँक्रिटीकरण रस्त्याला मातीचा भराव टाकून डांबरीकरण केलेल्या रस्त्याला जोडण्यात आले आहे . पावसामुळे या भागातील मातीचा भराव हळूहळू खचत आहे . या मार्गावरून जाणारे अवजड वाहन अडकून पडले होते . येथील डांबरीकरणाचा खचलेला भाग उखडून निघाल्याने मोठा खड्डा पडला आहे . त्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू होती . रस्ता खचल्याची माहिती महामार्गाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले . कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने रस्ता खोदून त्याठिकाणी भराव टाकण्याचे काम हाती घेतले .