
जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | ऑक्टोबर ११, २०२३.
“सर्वसाधारणपणे आपली राजकीय उंची, अनुभव आणि जनसंग्रह यांची गोळाबेरीज करून मगच राजकीय आखाड्यात एखाद्या पैलवानाला आव्हान देण्यासाठी उतरावे असा प्रघात आहे. नाहीतर तोंडावर आपटून दात घशात जातात. मात्र कोकणात खासकरून संगमेश्वर तालुक्यातील शिल्लक सेनेच्या नेत्यांना याचे भान राहिलेले दिसत नाही. ‘मन की बात’ची लोकप्रियता किती आहे याबाबत ज्यांना कल्पना नाही अशांनी सवंग प्रसिद्धीसाठी रस्त्यावर, चौकात उभे राहून काहीही बरळले तर ते एकवेळ क्षम्य आहे. मात्र ज्यांची एक पिढी राजकारणात पुढे आली आणि दुसरी येऊ बघत आहे अशांकडून तारतम्याची अपेक्षा लोक ठेऊन असतात. मात्र सद्यस्थितीत लोकांच्या पदरी अपेक्षाभंग आणि निराशा पडताना दिसत आहे.” अशी घणाघाती टीका भाजपा नेते व संगमेश्वर-चिपळूण विधानसभेचे निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, “विरोधी पक्षाने सरकारवर जरूर टीका करावी; तो त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. मात्र या टीकेमध्ये संवेदनशीलता असावी, जनतेप्रती कटिबद्धता असावी आणि काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय विषयांची जाण असावी. सिलेंडर दरवाढ हा टीकेचा विषय आहे किंवा नाही हा प्रश्न दुय्यम आहे. पण देशाने एक काळ पाहिला होता लोकांना सिलेंडर नेण्यासाठी उन्हा-पावसात रांगा लावाव्या लागत होत्या. आज वितरण कंपन्यांकडून सिलेंडरचे वितरण सुरळीतपणे व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आधी अडीच वर्षे कोरोना मागील वर्षापासून रशिया-युक्रेन युद्ध आणि आता हमासने काढलेली इस्रायलची कुरापत अशा प्रतिकूल वातवरणातही भारत सरकार सिलेंडरचा योग्य प्रमाणात पुरवठा करत आहे याबाबत कृतज्ञता व्यक्त करणे राहिले बाजूला; यांचे भलतेच. जरा वेळ काढून पाकिस्तान, श्रीलंका दौरा करा. अगदीच आंतरजाल (इंटरनेट) वर माहिती घ्या. श्रीलंका आपल्या शेजारील देश असून तिथे सिलेंडर ३७०० श्रीलंकन रुपये देऊन विकत घेतला जातो. तिथे १२.५ किलो वजनाचे सिलेंडर मिळतात. आपला १ रुपया तिथे ३.९० रुपये इतका आहे. गणित स्पष्ट होण्यासाठी १ किलोचा दर भारतीय रुपयांमध्ये काढू. भारतात १ किलो घरगुती गॅस ६३.५६ रुपयांना मिळतो. आता हेच श्रीलंकेत विकट घ्यायचा म्हटलं तर ७५.९० भारतीय रुपये लागतील. याचाच अर्थ १ सिलेंडरमागे आपल्या शेजारील देशात १७७ भारतीय रुपये अधिक द्यावे लागतात. आता तिथल्या नेत्यांच्या बायका त्यांच्या कार्यकर्त्यांना रोज जेवण देतात का याची चौकशी प्रत्यक्ष जाऊन करावी लागेल.”
“म्यानमार देशातील नागरिक १६.३ किलो वजनाचा १ एलपीजी सिलेंडर तब्बल २०-२५००० म्यानमार क्याट देऊन खरेदी करतात. बांगलादेशी नागरिक १२ किलो वजनाच्या सिलेंडरसाठी १२८४ बांगलादेशी रुपये (टका) खर्च करतो. नेपाळी नागरिकालादेखील १८९५ नेपाळी रुपये तर पाकिस्तानमधील सर्वसामान्य नागरिक ३०७९ पाकिस्तानी रुपये खर्च करतो. विरोधी नेत्यांनी लोकांच्या पुढ्यात भाषणबाजी करताना उपलब्ध आकडेवारी समोर ठेऊन तुलना करावी आणि त्यानंतर वाढत्या महागाईबाबत भारत सरकारला दोष द्यावेत. माहितीसाठी एक विषय सांगतो, शेतकरी बांधवांना युरियाच्या एका पोत्यासाठी जवळपास ३०० रुपये खर्च करावे लागतात. मायबाप सरकार मात्र हाच युरिया २७०० रुपये प्रति पोते दराने आयात करते आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती हवी असेल तर अवश्य माहितीच्या अधिकाराचा वापर करावा.” असे आवाहनही यावेळी श्री. अधटराव यांनी दिले.