
मुंबई- राज्यातील काही भागात पावसाचा जोर असून श्रावण सरींचे देखील वेध लागले आहेत. आज मुंबईसह कोकण, घाटमाथा आणि इतर ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कुठं ऑरेंज, तर कुठं यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथ्यावर आणि नदीकाठच्या भागांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून स्थानिक प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी गरजेचे सामान जवळ ठेवावे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं. पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. यासोबतच 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पालघरसाठी देखील यलो अलर्ट जारी केला असून मासेमार, शेतकरी आणि खेड्यातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईत आज विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असून हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असून मुंबईसह उपनगरांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक आणि दळणवळणावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जाणं टाळावं आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलंय. नवी मुंबई आणि ठाणे शहरांतही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा अंदाज आहे. याठिकाणी देखील ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे झाडे, विजांच्या तारा पडण्याचा धोका असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
