
रत्नागिरी – मोबाईल हे आधुनिक शस्त्र आहे, त्या माध्यमातून सायबर गुन्हे होत आहेत. आधुनिक यंत्रणेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. रत्नागिरी जिल्हा संपूर्ण सीसीटीव्हीच्या नजरेत आणला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
पोलीस विभागाला प्राप्त 10 स्कॉर्पिओ, 14 सी प्रहरी (ई बाईक) तसेच व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टीमचे लोकार्पण येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. या कार्यक्रमाला आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत, माजी शिक्षण सभापती विलास चाळके आदी उपस्थित होते.




पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, डीपीसीमधून पोलीस विभागाला लागणारी वाहने रत्नागिरीत सर्वात जास्त डीपीसीमधून आहेत. पोलीसांनी सुखकर आयुष्य जगले पाहिजे. त्यांच्यावरील ताण कमी झाला पाहिजे. त्यांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, त्यासाठी 178 कोटी मधून पोलीस निवास इमारत उभी राहत आहे. मुख्यमंत्री महोदयांचा 7 कलमी कार्यक्रम केवळ 100 दिवसांचा आराखडा न राहता, 365 दिवस कार्यक्रम चालला पाहिजे. समाजाला पोलीसांची आदरयुक्त भीती असली पाहिजे आणि पोलीसांनाही जनतेविषयी प्रेम असले पाहिजे.
मोबाईल हे आधुनिक शस्त्र बनले आहे. सायबर क्राईम होत आहेत. आक्षेपार्ह पोस्टवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांनी पुढाकार घ्यावा. देशात धर्मा-धर्मात भांडणे लावणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखला करावा. जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र सीसीटीव्ही लावले जातील. संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्यावर भर राहील, असेही पालकमंत्री म्हणाले.
आमदार श्री. जाधव म्हणाले, नागरिकांना त्यांना असणाऱ्या हक्कांची जाणीव झाली आहे. सायबर गुन्ह्यांची वाढ झाली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्ह्याचा शास्त्रशुध्दपणे उकल करावा लागतो. पोलीसांनी गुन्हा नोंद केला नाही, तर तो ऑनलाईन दाखल केला जातो. सर्वसामान्य जनतेसाठी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जाताना, त्यांच्या वाहनाच्या काचा खाली असल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.
स्वागत प्रस्ताविकेत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, पोलीस विभागामार्फत प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. ठाण्यांमध्ये येणारा नागरिक त्याचे काम झाल्यावर व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीमध्ये पोलीसांविषयीचा अभिप्राय नोंदवू शकेल. पोलीस विभागांमधील जिल्ह्याची असणारी शिस्तीची परंपरा यापुढेही चालू ठेवली जाईल.
अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.