११ तोळे सोने, रोख रक्कम आणि पाच किमती मोबाईल हस्तगत.
मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशीच चोरी करणाऱ्या एका चोरास मुंबईच्या समता नगर पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक करून त्याच्याकडून ११ तोळे सोने, रोख रक्कम आणि पाच किमती मोबाईलदेखील जप्त केले आहेत. सुशांत दिनेश खेडेकर (वय-२३ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर चोरीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाकूर व्हिलेज जुनापाडाच्या झोपडपट्टी परिसरात पहाटेच्या वेळी नागरिक काही कामानिमित्त, शौचालयासाठी किंवा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्यानंतर अज्ञात व्यक्ती घरात घुसून मौल्यवान दागिने, रोख रक्कम आणि चार्जिंगसाठी ठेवलेले मोबाईल फोन घेऊन फरार झाल्या विषयीची तक्रार समता नगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. या तक्रारीवरून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करून याचा तपास गुन्हे प्रकटीकरण कक्षाकडे सोपवण्यात आला.
तपास अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण कक्ष टीम प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन त्याचे सीसीटीव्ही फुटेज काय आहेत याची तपासणी करून तपासास सुरुवात केली. गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीवरून गुन्हे अभिलेखा वरील सुशांत दिनकर खेडेकर उर्फ सुसू हा परिसरात संशयास्पद रित्या फिरत असताना गुन्हे प्रकटीकरण कक्षाने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशी दरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेले 11 तोळे दागिने, रोख रक्कम अकरा हजार आणि पाच महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले. समता नगर पोलिसांनी आरोपीला अटक करून या आरोपीने मुंबई शहरात आणखी कुठल्या ठिकाणी चोरी केली आहे का? या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.