पिरंदवणेवासियांनी अनुभवला श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दैवी क्षण…

Spread the love

स्त्री-पुरुष ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक ग्रामदुर्गा मंदिरात एकत्र… मिरवणूक, दिंडी, भजन, आरत्या, हळदी-कुंकू आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून केली रामवंदना…!

पिरंदवणे | जानेवारी २२, २०२३.

संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथे आज अबालवृद्ध ग्रामस्थांनी एकत्रितपणे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री ग्रामदुर्गा लक्ष्मी मंदिरात प्रत्यक्ष पाहिला. देवस्थान समितीच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी मोठ्या पडद्याची व्यवस्था करण्यात आली होती.

तत्पूर्वी संपूर्ण गावात अयोध्येतून आलेल्या अक्षता घरोघरी वितरीत करण्याचे कार्य गावातील ज्येष्ठांनी पार पाडले. रामभक्तांनी स्वच्छता अभियान राबवून गावातील सर्व धार्मिक स्थळांची स्वच्छता केली. महिलांनी ग्रामदेवता मंदिरात सडा-सारवण करून रांगोळ्या घातल्या. तरुण मुलांनी पताके लावून मंदिराची सजावट केली. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून पूर्वतयारी करून घेतली. एकूणच मागील संपूर्ण आठवडा पिरंदवणे राममय झाल्याचे दिसून आले.

आज सकाळी जि.प. पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पिरंदवणे येथील विद्यार्थ्यांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मोहक वेशभूषा साकारून ग्रामस्थांची वाहवा मिळवली. ढोल-ताशांच्या गजरात सजवलेल्या रथातून त्यांची मिरवणूक सुरु झाली. इथे ग्रामस्थांनी अभंग म्हणत दिंडी घातली. ‘एकही नारा, एकही नाम… जय श्रीराम, जय श्रीराम’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. सोबतच उत्साही तरुणांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. श्री गांगेश्वर व श्री लक्ष्मी यांचे दर्शन घेऊन ही मिरवणूक विसर्जित झाली व पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली.

श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर ‘भारत का बच्चा बच्चा.. जय जय श्रीराम बोलेगा’ या गाण्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. यानंतर अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पडद्यावर दाखवण्यात आले. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर करूणामय भक्तीभाव स्पष्ट दिसत होता. अनेकांना राममंदिरासाठी झालेला संघर्ष आठवून डोळे पाणावल्यासारखे झाले. यावेळी महिलावर्गाचा हळदीकुंकू समारंभही संपन्न झाला.

देवीच्या पुजाऱ्यांनी सर्व देवतांना महानैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली. सायंकाळी घरोघरी, मंदिरांमध्ये, सार्वजनिक स्थळी दिवाळीप्रमाणे दिवे लावण्याची आठवण करून देण्यात आली. यानंतर सर्वांनी श्रीरामांच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. अशाप्रकारे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात गावातील अबालवृद्धांनी लक्षणीय संख्येने उपस्थिती लावत या दैवी क्षणांची अनुभूती घेतली. गावातील दानशूर व्यक्तींच्या सहयोगातून आणि अनेकांच्या निरपेक्ष श्रमदानातून कार्यक्रम सिद्धीस गेला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page