मुंबई :- शिवसेना आमदार अपात्रतेच्या अंतिम निकालाची सुनावणी सुरु आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाच वाजल्यानंतर निकालाच्या वाचनाला सुरुवात केली. शिवसेना मूळ पक्ष कुणाचा? यासंबंधीच्या पुराव्यांवर त्यांनी मुद्दे मांडले.
शिवसेना संघर्षासंबंधी ३४ याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश असून व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत, असं नार्वेकरांनी निकाल वाचताना सांगितलं.
नार्वेकर निकाल वाचताना म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत आहे. प्रत्येक गटातील ठळक मुद्दे मी वाचून दाखवणार आहे. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या १९९९ सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. २०१८ साली शिवसेनेने घटनेमध्ये केलेले बदल आम्हाला मान्य नाहीत.
”दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. ठाकरेंनी दिलेली घटना आम्हाला मान्य नाही. निवडणूक आयोगाकडे २०१८पूर्वीची घटना उपलब्ध असून निवडणूक आयोगाने दिलेली घटना मी मान्य करतो, आयोगाकडे मागणी केल्यानंतर ती मूळ घटना प्राप्त झालेली आहे.”
नार्वेकर पुढे म्हणाले, उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र अमान्य आहे २०१८ अंतर्गत निवडणूक नाही, त्यामुळे घटनादुरुस्ती चुकीची आहे. शिवसेना पक्षप्रमुख अर्थात अध्यक्ष पदासंदर्भातील निर्णय मी देणार असून पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी ही सर्वोच्च आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे असं सांगत राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट, या दोन्ही गटांचं तुलनात्मक विश्लेषण केलं. पक्षावर कुणाचा हक्क यासंदर्भात त्यांनी मांडणी केली असून त्यासंदर्भातला अंतिम निर्णय देणार असल्याचं म्हटलं आहे. पाऊण तासामध्ये आमदार अपात्रतेसंबंधी त्यांनी भाष्य केलेलं नाही.
जाहिरात