
संगमेश्वर : दिनेश अंब्रे – गाव निढळेवाडी येथील नवोदित कवयित्री सौ. राधा कुंदन साटविलकर (मृणाली मुरलीधर वाडकर) यांनी तब्बल १२१ कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या या साहित्यिक कार्याचा गौरव करण्यासाठी नावाडी येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर आणि पत्रकार दिनेश अंब्रे यांनी जागतिक कविता दिनानिमित्त निढळेवाडी येथील त्यांच्या माहेरी जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
सौ. राधा साटविलकर या मूळच्या दापोली तालुक्यातील रहिवासी असून, शिमगोत्सव निमित्त पालखी दर्शनासाठी त्या सध्या माहेरी निढळेवाडी येथे आल्या होत्या. त्यांच्या कवितांचा मुख्य विषय स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण, सामाजिक जीवन आणि धार्मिक परंपरा यावर आधारित आहे.
संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये मृणाली वाडकर हीचे पाचवी ते दहावीपर्यंत सर्व शिक्षण झाले. पैसा फंडच्या शिक्षकांनी तिच्या यशाविषयी कौतुक व्यक्त केले व तिला शुभेच्छा दिल्या.
यावेळी परिवारातील सदस्य उपस्थित होते. या नवोदित कवयित्रीच्या काव्यलेखनाच्या कार्याचा गौरव करत विशेष अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.