भाजपा जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव यांचे प्रतिपादन.

जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | सप्टेंबर २९, २०२३.
भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (दक्षिण) च्या नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस व संगमेश्वर भाजपाच्या नेत्या सौ. संगीताताई जाधव यांनी ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ कायद्यात रुपांतरीत झाल्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या “भारतीय लोकशाहीच्या नव्या मंदिरात गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश केल्यानंतर राष्ट्रगौरव पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदीजी यांच्या प्रेरणेने केंद्रीय कायदेमंत्री ना. अर्जुन राम मेघवाल यांनी ‘नारी शक्ती वंदन विधेयक २०२३’ संसद सदस्यांसमोर चर्चेसाठी मांडले. तब्बल २७ वर्षे प्रतिक्षा केल्यानंतर काही अपवाद वगळता दोन्ही सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांनी महिलांना ३३% आरक्षण मिळावे यासाठी मतदान केले. आणि अभूतपूर्व बहुमताने पास झालेले हे विधेयक देशाच्या महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीम. द्रौपदीजी मुर्मू यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले. आज शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर २०२३ हा ऐतिहासिक दिवस असून आज महामहीम राष्ट्रपती महोदयांनी विधेयकावर स्वाक्षरी केली यानंतर सरकारने नारी शक्ती वंदन कायद्याचे राजपत्र अधिसूचना जाहीर केली आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, “भारतीय संस्कृतीत स्त्रियांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीचा होता याबाबत अनेक उदाहरणे इतिहासाच्या पानांमध्ये आढळतील. मात्र सतत होणारी आक्रमणे आणि त्यातून महिलांवर होणारे अनन्वित अत्याचार यांतून स्त्रियांना तत्कालीन समाजव्यवस्थेने घराबाहेर पडण्यास बंदी घातली. याच पुढील काळात झालेला अतिरेक स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक स्त्रियांना भोगावा लागला. मात्र देशातील कोट्यावधी महिलांचा भाऊ बनून प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांनी स्त्रियांसाठी दिलेली ही ओवाळणी संस्मरणीय आहे. ही ओवाळणी देशातील तमाम माता-भगिनींना केवळ राजकीय प्रतिनिधित्वच नाही तर सामाजिक प्रतिष्ठाही लाभणार आहे. त्यामुळे दुबळी आता सबला होईल, सामान्य महिला असामान्य कर्तृत्त्व करण्यासाठी सज्ज होईल याबाबत तीळमात्र शंका नाही.”
“तुमच्या “मा. मोदीजींनी लाख रुपये दिले का?” असे खोचकपणे विचारणाऱ्या विरोधकांनी जरा आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन घरातील माता-भगिनींना विचारावे “माई मोदीजींनी तुम्हाला काय दिले?” त्या माऊलीही सांगतील, “मोदीजींनी जन-धन खाते काढून दिले, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर दिला, मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून गर्भवती मातेची काळजी घेतली, जलजीवन मिशन राबवून घरात नळ दिले; त्यामुळे डोक्यावरील हंडे खाली उतरले, सुकन्या योजनेमुळे मुलींचे शिक्षण आणि लग्नाची चिंता दूर केली, मुद्रा योजना आणून अन्नपूर्णेला ‘स्वयंपूर्णा’ केले, ‘तीन तलाक’ सारख्या कुप्रथेवर कायद्याने घाव घालून मुस्लिम भगिनींना आधार दिला. १५ लाख आयुष्याला पुरतील की नाही माहित नाही; पण मा. मोदीजींनी जे दिले त्यामुळे आमचा परिवार सुखी झाला.” नरेंद्र मोदीजी हे संन्यस्त योगी आहेत. आणि देशातील महिलांना अशाच मोठ्या भावाची कित्येक वर्षे अपेक्षा होती. आज मोदीजी पुन्हा एकदा अग्निपरीक्षेला सामोरे जात असताना देशभरातील तमाम माता-भगिनी त्यांच्यासाठी पुढे येतील.” असे म्हणत सौ. जाधव यांनी विरोधकांना नारीशक्ती आता मोदीजींना अंतर देणार नसल्याची जाणीव करून दिली.
“कायदा संसदेत पारित होताना झालेल्या चर्चा संपूर्ण देशाने पाहिल्या आहेत. १९९६ पासून या विधेयकाला सातत्याने विरोधी पक्षाने यावेळी विरोध केला नाही याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे आता ते श्री. नरेंद्रभाई मोदी या नावापुढे हतबल आहेत. विरोधाचे बळ त्यांच्या ठायी शिल्लक नाही. त्यामुळे ‘नारी शक्ती वंदन कायदा’ हे कोण्या एकाचे श्रेय नाही अशा प्रकारचे तारे तोडू नये. श्रेय तर मोदीजींचे आहेच पण आता महिलावर्गही मोदीजींच्या पाठीशी आहे. हा कायदा जरी २०२९ पासून लागू होणार असला तरी २०२४ मध्ये मोदीजी प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा संसदभवनात जातील त्यावेळी महिला लोकप्रतिनिधींची संख्या निश्चितच वाढल्याचे बघायला मिळेल.” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. “तूर्तास हे विधेयक राज्यांच्या विधानसभांमध्ये जाणार असून देशातील ५०% विधानसभांमध्ये ते पारित करणे अत्यंत आवश्यक आहे.” अशी माहिती सौ. संगीताताई जाधव यांनी दिली.