
मुंबई : उकाड्याने घामाघूम झालेल्या तसंच आकाशाकडे डोळ लावून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात यंदा मान्सूची सुरुवात कधी होणार आहे, याची तारीख ठरलीय. महाराष्ट्रात यंदा मान्सून ५ ते ७ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय.
यंदा मान्सून १० दिवस अगोदरच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. केरळमध्ये तो १९ मेपर्यंत दाखल होणार असल्याचा ताजा अंदाजही वर्तवलाय. मान्सूनचं आगमन लवकर होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे. कारण हा मान्सून पेरणीसाठी फलदायी ठरणार आहे, असाही अंदाज वर्तवण्यात आलाय.
अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टाही निर्माण झालाय. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णता वाढलीय. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढलाय. याचा परिणाम म्हणून बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरांवर बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत. इतकंच नव्हे तर यंदा ला निना आणि एल निनोचा प्रभाव दिसत नसल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण १०५ टक्क्यांपर्यंत असेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय.
केरळमध्ये पावसाच्या आगमनाची तारीख १ जून ही असते, मात्र यंदा १० दिवस अगोदर केरळमध्ये पाऊस दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
महाराष्ट्रात साधारणपणे ७ ते ११ जून दरम्यान मान्सून दाखल होतो. मात्र यंदा राज्यात मान्सून ५ ते ७ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय. तर १३ मेपासून महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे. यंदा महाराष्ट्रात १०३ ते १०५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरणार आहे.