पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी, ५ ऑक्टोबर २०२४ रोजी ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ व्या हप्त्यापोटी २० हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान हा हप्ता देतील.
काय आहे पीएम किसान योजना?..
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत दिली जाते. केंद्र सरकारनं आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधीचे १७ हप्ते दिले आहेत. या वर्षी जूनमध्ये १७ वा हप्ता जारी करण्यात आला होता. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीनं देशभरातील शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात हप्ते वर्ग केले जातात. दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेले छोटे व अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
केवायसी करावंच लागणार!
पीएम किसान योजना योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना इलेक्ट्रॉनिक नो योर कस्टमर (E-KYC) प्रक्रिया अनिवार्यपणे पूर्ण करावी लागेल.
पीएम-किसान योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ईकेवायसीचे तीन मार्ग उपलब्ध आहेत: ओटीपी-आधारित ई-केवायसी, बायोमेट्रिक-आधारित ई-केवायसी आणि फेस ऑथेंटिकेशन-आधारित ई-केवायसी.
ओटीपी आधारित ई-केवायसी: कसे निवडावे…
▪️पीएम-किसान योजनेच्या वेबसाइटला भेट द्या.
▪️ फार्मर्स कॉर्नर विभागात नेव्हिगेट करा आणि ई-केवायसी पर्याय निवडा.
▪️आपला आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा.
▪️यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
▪️ ओटीपी प्रविष्ट करा आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.