श्री मार्लेश्वर मंदिर सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते संपन्न; मान्यवरांच्याहस्ते स्मरणिकेचे अनावरण
देवरूख- संंगमेश्वर तालुक्यातील आंगवली गावात जिर्णोध्दारातून उभारण्यात आलेले भव्यदिव्य असे श्री मार्लेश्वर मंदिर आम्हा सर्वांसाठी नवी ऊर्जा देणारे ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शनिवारी आंगवली येथे उद्घाटनप्रसंगी केले आहे.
आंगवली येथील जुन्या मार्लेश्वर देवालयाचा (मठ) जिर्णोध्दार करून त्याजागी भव्यदिव्य असे श्री मार्लेश्वर मंदिर उभारण्यात आले आहे. आंगवली येथील आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर मंदिराच्या भव्य वास्तूचा जिर्णोध्दार सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने आज शनिवारी दुपारी मंदिराचा कलशारोहण सोहळा पार पडला. तर रात्री मंदिर सभागृहाचे उद्घाटन, स्मरणिका अनावरण, मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत बोलताना म्हणाले कि, आंगवली येथील हे श्री मार्लेश्वर मंदिर अतिशय भव्य व देखणे आहे. देवरूख- मार्लेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच हे मंदिर असल्याने स्वयंभू मार्लेश्वराच्या दर्शनासाठी जाणारे भाविक आंगवली येथील आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर मंदिराला भेट देवूनच पुढे जातील. त्यामुळे तालुक्याच्या पर्यटन वाढीस आणखी चालना मिळेल. मंदिर परिसराचा लवकरात लवकर आराखडा तयार करून द्या. यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याचे आश्वासनही पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलताना ग्रामस्थांना दिले. यावेळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना येथील ग्रामस्थांच्या मेहनतीतून मंदिराचा जिर्णोध्दार करून हे भव्य असे श्री मार्लेश्वर मंदिर उभारण्यात आले आहे. सर्वांना हेवा वाटेल असे हे मंदिर असून ग्रामस्थांना लागेल ती मदत करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमप्रसंगी माजी राज्यमंत्री रविंद्र माने, संंगमेश्वर-चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण, दत्तात्रय चाळके, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, माजी जि. प. उपाध्यक्ष संतोष थेराडे, ठाकरे गटाच्या महिला नेत्या नेहा माने, संंगमेश्वर तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार, उपतालुकाप्रमुख मनोहर गुरव, रत्नागिरी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, देवरूख शहराध्यक्ष सनी प्रसादे, माजी सभापती जया माने, मुरादपूरचे माजी सरपंच मंगेश बांडागळे, युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद, प्रफुल्ल भुवड, आंगवली गावच्या सरपंच अरूणा अणेराव आदिंसह आंगवली गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.