
१९ भक्तांनी सोळजाई देवी मंदिरासमोरील अंगणात लोटांगणे घालून फेडले नवस; यात्रेनिमित्ताने भाविकांची मंदिर परिसरात मांदियाळी
देवरूख/ प्रतिनिधी- देवरूख गावची ग्रामदेवता व तब्बल ४४ खेड्यांची मालकीण असलेल्या श्री देवी सोळजाई मातेची प्रसिद्ध लोटांगण यात्रा आज बुधवारी मोठ्या भक्तीभावात साजरी झाली. दुपारी ३.३० वाजल्यापासून प्रसिद्ध लोटांगण यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर देवीच्या कार्यक्षेत्रातील १९ भक्तांनी सोळजाई देवी मंदिरासमोरील अंगणात लोटांगणे घालून आपले नवस फेडले. यात्रेनिमित्ताने मंदिर परिसरात भाविकांनी अलोट गर्दी केली होती. उपस्थित भाविकांनी यात्रेचा मनमुराद आनंद लुटला.
भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या सोळजाई देवीची ख्याती आहे. सोळा कला जिच्या अंगामध्ये आहेत. अशी सोळजाई देवी सर्व भक्तांच्या मनोकामना पुर्ण करते. देवरूख गावच्या उदक मंडलावर चौरंग्याच्या माथ्यावर सोळजाई देवी विराजमान झाली आहे. देवदिवाळीच्या मुहुर्तावर प्रतिवर्षी सोळजाई देवीची लोटांगण यात्रा साजरी केली जाते. यात्रेच्या दिवशी म्हणजेच आज बुधवारी सकाळी पुजारी गुरव, शेट्ये, मानकरी पर्शराम गावकर व भक्तांच्या उपस्थितीत सोळजाई देवीचे यथासांग पूजन करून देवीला रूपे लावण्याचा धार्मिक कार्यक्रम झाला.
यानंतर सोळजाई देवीच्या प्रसिद्ध लोटांगण यात्रेला दुपारी ३.३० वाजल्यापासून प्रारंभ झाला. यामध्ये देवीच्या कार्यक्षेत्रातील १९ भक्तांनी सोळजाई देवीच्या मंदिरासमोरील अंगणात लोटांगणे घालून आपले नवस फेडले. या लोटांगण यात्रेमध्ये नवस फेडण्यासाठी सोळजाई देवी मंदिरासमोरील अंगणात प्रदक्षिणेच्या रूपात ही लोटांगणे घातली गेली. पाच फेऱ्यांमध्ये लोटांगणाचा धार्मिक कार्यक्रम झाला. लोटांगण कार्यक्रमाला सुरूवात झाल्यानंतर मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली. यात्रेनिमित्ताने भक्तांच्या गर्दीने सोळजाई मंदिर परिसर अक्षरशः फुलून गेला होता. अशाप्रकारे सोळजाई देवीची प्रसिद्ध लोटांगण यात्रा भक्तीमय वातावरणात पार पडली.