मुंबई :- मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा २२ किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात मोठा सागरी पूल तयार करण्यात आला आहे. ‘अटल सेतू’ असे या सागरी पुलाला नाव देण्यात आले असून याचे उद्घाटन आज शुक्रवारी (दि.१२) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पुलामुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर सहज पार होणार आहे.
१८ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या सागरी पुलाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. हा MTHL पूल मुंबईतील शिवडीपासून सुरू होतो. आणि रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा येथे संपतो. या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई हे २ तासाचे अंतर अवघ्या २० मिनिटात पुर्ण करता येणार आहे. हिवाळ्यात दरवर्षी समुद्रावर फ्लेमिंगो पक्षी येतात त्यांचा विचार करून सागरी पुलाच्या बाजूला सांऊड बॅरिअर बसवण्यात आला आहे. या पुलावर आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित ४०० सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या पुलावर चारचाकी वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा १०० किमी असेल. तसेच मोटारसायकल, मोपेड, तीनचाकी वाहने, ऑटो, ट्रॅक्टर या वाहनांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.