रत्नागिरी : वीरकर भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (द.) च्या नेतृत्त्वात खांदेपालट झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी डॉ. ऋषिकेश केळकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये करण्यात आलेले बदल संघटना बळकट करतील असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष सावंत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीचे सर्वाधिक काळ नगराध्यक्ष पद भूषवलेले डॉ. जगन्नाथ शंकर केळकर यांचे नातू डॉ. ऋषिकेश केळकर हे एम.बी.बी.एस. डॉक्टर असून काही काळ त्यांनी जिल्हा रुग्णालयात सेवा दिली. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात काम करता करता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून भाजपामध्ये आपल्या संघटनात्मक कौशल्याची छाप पाडली. याच गोष्टींचा प्राधान्याने विचार करत पक्षाने नेतृत्त्वाची धुरा ‘युवा’ केळकर यांच्या हाती दिल्याने युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. ऋषिकेश केळकर म्हणाले, “भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशातील सर्वांत मोठा प्रभावी पक्ष असून या रत्नागिरी (द.) जिल्ह्यातील युवांचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली ही अत्यंत सुखद गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे सा. बां. मंत्री व कोकणचे नेते मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब, जिल्हाध्यक्ष राजेशदादा सावंत, मा. आमदार तथा माझे मार्गदर्शक बाळासाहेब माने, आमचे ज्येष्ठ बंधू व मा. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेतदादा पटवर्धन यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाखाली, त्यांचे राजकीय व सामाजिक अनुभवांची शिदोरी घेऊन माझ्या सहकाऱ्यांच्या साथीने ‘महाविजय २०२४’ साठी ‘गाव तिथे बूथ आणि बूथ तिथे युथ’ साठी आगामी काळात मी प्रयत्नशील राहीन.”
जाहिरात