प्रश्नांना समर्पक उत्तरे न देता केवळ संदिग्धता निर्माण करण्याचे धंदे करणाऱ्यांनी थोडी ‘या प्रश्नांचीही’ उत्तरे द्यावीत.
जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | ऑक्टोबर ०४, २०२३.
“शिक्षणावर होणाऱ्या वारेमाप खर्चाबाबत बोलणाऱ्यांनी जरा आपल्या शैक्षणिक संस्थामध्ये घेत असलेल्या फी बाबत जाहीर चर्चा करण्याचे धाडस दाखवावे. नर्सरीमध्ये घेतल्या जाणाऱ्या फीचे विवरण आणि आपले अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील फी तफावत जनतेच्या समोर मांडावी. कोकणात येणाऱ्या प्रत्येक आस्थापनाला विरोध करणारे शिवसेना नेते आता कोकणी माणसाच्या रोजगाराचा प्रश्न उचलतात त्यावेळी कीव येते. एन्रॉन, फिनोलेक्स, चौगुले आणि आता नाणार प्रकल्पांना विरोध करणाऱ्या शिवसेना नेत्यांनी आणलेल्या रोजगाराच्या संधी ‘जन की बात’मध्ये आवर्जून मांडाव्यात.” असे प्रत्युत्तर देत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते प्रमोद अधटराव यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे.
“शीर्षस्थ नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कोकणातील युवा नेते टोमणेबाजी करतात त्यावरून सैरभैर अवस्था स्पष्ट दिसून येत आहे. ‘विकास ही निरंतर प्रक्रिया आहे’ हे ज्यांना समजत नाही त्यांच्याकडून वंदनीय बाळासाहेबांचे ८०% समाजकारण समजून घेण्याची अपेक्षा निरर्थक आहे. युवा नेतृत्त्वाने आधुनिकतेची कास धरत 5G च्या जमान्यात भारतातील महागाई आणि अन्य देशांतील महागाई यांची तुलना करून समाजात व्यक्त होणे अभिप्रेत आहे.”
“माता-भगिनींना धुराचा त्रास होऊ नये म्हणून उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर मा. मोदीजींच्या सरकारने दिला. त्यावेळी वितरण करताना फोटो काढायला आलेले नेते आज दरवाढीबाबत बोलतात हे हास्यास्पद आहे. ११५०-१२०० पर्यंत गेलेला सिलेंडर गणपतीत ४०० रुपयांचे अनुदान आणि दिवाळीसाठी ३०० रुपये सवलत देण्याचा निर्णय घेणारे सरकार भारतीय जनता पार्टीचे आहे. ‘मोफत रेशन’, ‘आनंदाचा शिधा’ देणारे सरकार लोकांमध्ये प्रभावी ठरत आहे. ज्यांनी कोरोना काळात दारूचे गुत्ते महसूल गोळा करण्यासाठी सुरु केले अशा लोकांनी शाळा आणि दारू दुकानांचे परवाने यांवर भाष्य न केलेलेच बरे.”
“कोकणात वीज महाग आहे असे म्हणणाऱ्यांनी उपलब्ध संसाधनांचा जरूर अभ्यास करावा. मा. रविंद्रजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर रस्त्याच्या कामात आलेल्या गतिमानतेला दुर्लक्षित करून टवाळक्या करण्यापूर्वी इतक्या वर्षांत केलेल्या प्रयत्नांचीही ‘जन की बात’मध्ये चर्चा करावी. नेटवर्क समस्या अनेक ठिकाणी आजही भेडसावत आहे ही गोष्ट अत्यंत खरी असली तरी मागील ५ वर्षांपूर्वी आमदार आपलेच होते. आत्ताही ६ महिन्यांपूर्वी या भागातील आमदार तुमच्याचकडे होते. मग त्यांनी काहीच प्रयत्न केला नाही हा दोष भाजपचा कसा? याबाबतही स्पष्टीकरण द्यावे. जमाना बदलला आहे, लोकांच्या वाढत्या अपेक्षा रास्त आहेत पण माजी आमदार बिरुदावली मिरवणारे या अपेक्षांचा विचार सार्वत्रिक जीवनात मांडताना दिसत नाहीत. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनचे श्रेय लाटण्यासाठी पुढे रहाणारे हे नेते आज संगमेश्वर तालुक्यातील बोजवाऱ्याला जबाबदार आहेत. लोक आत्ता तुमच्या सर्व नौटंकी डोळसपणे पहात आहेत. आज तुम्हाला आपल्याच २५ लोकांच्या टाळ्या मिळत असल्या तरीही २०२४ नंतर टाळ कुटायला मायबाप जनता भाग पाडणार आहे.”
“मोदी साहेबांच्या भूलथापांना बळी पडून ९ वर्षे एकहाती सत्ता दिली म्हणणाऱ्यांनी आपण आपल्या मतदारसंघात आपण कोणाला निवडून दिले याचे तरी अवलोकन करायचे होते. पण ओढूनताणून केलेल्या कार्यक्रमात पक्ष नेतृत्त्वाला खुश करण्यासाठी आपल्याच लोकांकडून प्रश्न विचारून घेतले एवढेच नाही तर प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यात आपण कमी पडतोय याची जाणीव झाल्यानंतर उत्तरे देण्याचे बंद केले यावरून पराभूत मानसिकता स्पष्ट दिसत आहे. बँकिंग हा अत्यंत क्लिष्ट विषय असल्याने उपस्थित केलेले प्रश्न स्वतः मान्यवरांनाच समजले नाहीत. नीरव मोदीसारख्या लोकांना कर्ज काँग्रेसच्या काळात देण्यात आले होते ही माहिती लपवून काही साध्य होणार नाही. भारतीय जनता पार्टी आता कोकणात रुजली आहे. लोकांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्याचे सामर्थ्य आमच्याकडे आहेच सोबत आम्हीही काही प्रश्न उपस्थित करू त्याची उत्तरे मात्र तयार ठेवा.” असा गर्भित इषारा शिवसेनेला देण्यास अधटराव विसरले नाहीत.