*पुणे-* अरबी समुद्रात सौराष्ट्रालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
*कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा?*
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज शुक्रवारी कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
*मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता..*
तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा यलो अलर्ट आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
*सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर वाढणार..*
दरम्यान, नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान 106 टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला. ऑगस्टमध्ये देशात सरासरी (94 ते 106 टक्के) पावसाचा अंदाज आहे. थोडक्यात, उर्वरित हंगामाचा विचार करता ऑगस्ट महिन्यात कमी, तर सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.