मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मुंबईच्या मलबार हिल परिसरातल वर्षा बंगल्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. वर्षा बंगल्यात कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नाहीत.
मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री तिकडे झोपणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही देवेंद्र फडणवीस सागर बंगला सोडून वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते मंगळवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदी यांनी संसदेची जागा बदलली. आता लग्नाच्या हॉलमध्ये संसद भरवली जाते. आज पंतप्रधान मोदी अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होणार आहेत. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आपण दिल्लीला जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. मात्र, यावेळी संजय राऊत यांनी मुंबईतील वर्षा बंगल्याबाबत एक धक्कादायक दावा केला.
त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावर राहायला का गेलेले नाहीत? त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतके दिवस झाले. मग ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? हा आमचा प्रश्न आहे. मुख्यमंत्रीपदाचं अधिकृत निवासस्थान राज्याच्यादृष्टीने प्रतिष्ठेचा विषय आहे. मग आमचे लाडके मुख्यमंत्री तिकडे राहायला का जात नाहीत? मी असं ऐकलंय की, देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की, मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री झोपायला जाणार नाही. राज्यातील लिंबू सम्राटांनी याचं उत्तर द्यावे. शिंदे गटात असे अनेक लिंबूसम्राट आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
*वर्षा बंगल्याच्या हिरवळीत खोदकाम, रेड्यांची शिंग पुरली?*
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्षा बंगल्याबाबत अत्यंत स्फोटक दावा केला. भाजपच्या वर्तुळात अशी चर्चा आहे की, वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत.
आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. मात्र, वर्षा बंगल्यावरील कर्मचारी वर्गात अशी कुजबुज रंगली आहे. कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची ही शिंग मंतरलेली आहेत. जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल, त्याचं मुख्यमंत्रिपद टिकू नये, यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंगं वर्षा बंगल्यावर पुरुन ठेवण्यात आली आहे.
त्यामुळेच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, पण ते अधिकृत निवासस्थानी जायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस अस्वस्थ का आहेत, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या राज्याला महात्मा फुले यांच्यापासून ते संत गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरे यांची परंपरा आहे. या सगळ्यांनी राज्यातून अंगारे-धुपारे आणि अंधश्रद्धा हद्दपार केली, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
*एकनाथ शिंदे नाराज?*
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अद्याप नाराज असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आहे. गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच हजेरी लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रालयात बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती. याशिवाय नगरविकास आणि पाणी पुरवठा मंत्रालयाच्या नियोजित बैठकाही त्यांनी रद्द केल्या होत्या.
आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार की नाही, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिंदेंच्या नाराजीमागील नेमकं कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे.