
राजापूर / प्रतिनिधी – तालुक्यातील सागवे-नाखेरे येथे रस्त्याचे काम करताना एक पुरातन तोफ सापडली असुन अद्यापही त्या पुरातन तोफेची दखल पुरातत्व विभागने न घेतल्याने आता येथील ग्रामस्थानी ही तोफ गावातच एका ठिकाणी ठेवली आहे . गेली कित्येक दशके जमिनीच्या पोटात असणारी ही तोफ सापडल्याने आता राजापूर तालुक्याच्या इतिहासावर प्रकाश पडणार आहे .
सध्या ही तोफ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असुन यामुळे शिवकालीन इतिहासावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार घेण्याची मागणी करण्यात येत आहे . या तोफेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लष्करी तंत्रज्ञान समजून घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचा अंदाजही येथील ग्रामस्थानी वर्तवला आहे .
शासनाच्या पुरातत्व विभागाचे कार्यालय रत्नागिरीत असले तरी हे कार्यालय कोकणासाठी फक्त शोभेचे बाहुले बनुन राहीले आहे . सध्या या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार पुणे येथील सहाय्यक आयुक्त विकास वाहणे यांच्याकडे असल्याने ते या कार्यालयाला पुरेसा वेळ देत नसल्याची बाब समोर आली आहे . शासनाच्या पुरातत्व विभागाअंतर्गत राजापूर तालुक्यातील घेरा यशवंत गडाच्या संवर्धनाचे काम सुरु असुन ते आताच कोसळल्याची बाब पुढे आली आहे . सहाय्यक आयुकत विकास वाहने हे या कामाची पाहाणी करण्यासाठी रात्री येत असल्याची बाब नाटे येथील ग्रामस्थानी बोलुन दाखवत नाराजी व्यक्त केली होती .
पुरातत्व विभागाचे लक्ष या तोफेकडे वेधले जाणे अत्यंत आवश्यक आहे. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे राजापूर तालुक्यातील अनेक ऐतिहासिक वस्तू आणि ठिकाणे आजही उजेडात आलेली नाहीत. जर या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन आणि संशोधन केले, तर भविष्यात आणखी शिवकालीन खजिना आणि साहित्य सापडण्याची शक्यता आहे. हे आपल्या समृद्ध इतिहासाचे जतन करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.त्यामुळे भारतीय पुरातत्व विभागाने अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तूंच्या संवर्धनाची आणि पुढील संशोधन करण्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे . मात्र रत्नागिरी पुरातत्व विभाग हा शोभेचे बाहुले बनुन राहीलेला आहे .
आता तरी राजापूर तालुक्यातील सागवे नाखेरे येथे सापडलेल्या या पुरातन तोफेचे पुरातत्व विभाग जतन करणार का ? याकडे शिवप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत