मुंबई- आता हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला आहे. बांगलच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिमाण होणार आहे. राज्यात तापमानात मोठी घट होताना दिसत आहे. रात्रीची थंडी वाढल्याने अनेक जिल्हे गारठले आहेत. पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया अशा जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. कमाल तापमानात १ ते २ अंशांनी घट झालीये. त्यामुळे डिसेंबर महिन्यात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात पारा घसरला आहे. पुण्यात तापमानात एक ते दीड अंशांनी कमी झाले आहे. रात्रीपासून थंड वारे वाहू लागले आहेत. या सोबतच आता दिवसा देखील थंडी जाणवू लागली आहे. पहाटेच्या सुमारास तापमानात मोठी घट होत आहे. नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेऊ लागले आहेत. पुढील काही दिवसांनत थंडी आणखी वाढणार आहे. हवामान विभागाने डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन महिने राज्यासह देशातही थंडीसाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे. 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरचा काळ हा बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळांच्या निर्मितीसाठी पूरक मानला जातो, पुढे डिसेंबरमध्ये मात्र वादळाची ही शक्यता कमी होते. परिणामी कमी दाबाच्या पट्ट्यामुळं तापमानात घट होण्याची शक्यता तुलनेनं कमीच आहे. हिमालय आणि उपहिमालय क्षेत्रामध्ये पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळे राज्यासह देशातून थंडी इतक्यात काढता पाय घेण्याची शक्यता कमीच असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय या क्षेत्रांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्यानं होणारी बर्फवृष्टी पाहता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत थंडी पाठ सोडणार नाही असंच चित्र आहे. फक्त देशातच नव्हे तर राज्यात यंदा फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.