पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार असून, त्यांच्यासाठी जे करणे शक्य आहे ते सर्व केले जाईल- मंत्री उदय सामंत

Spread the love

रत्नागिरी : राजापूर येथे दुचाकीला धडक देऊन पत्रकाराला ठार मारल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर पत्रकार कायद्यान्वयेही कारवाई करण्यात येणार आहे. गंभीर घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे (डीवायएसपी) सोपवण्यात आला असल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

या घटनेला जबाबदार असणार्‍या गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार असून, त्यांच्यासाठी जे करणे शक्य आहे ते सर्व केले जाईल, असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. हा प्रकार समजल्यानंतर आपण तत्काळ याची माहिती घेतली व पोलिसांनी गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची सूचना केली. या प्रकरणाची आपण सातत्याने माहिती घेत आहोत. रिफायनरीला पाठिंबा किंवा विरोध हा लोकशाही मार्गाने मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असून, तो मांडू शकतो. परंतु ही घटना अत्यंत वाईट आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी संबंधित गुन्हेगारावर तत्काळ गुन्हादाखल करून कारवाई केली. यात लागलीच खुनाचा गुन्हा दाखल करताना 302 कलम लावण्यात आले आहे.प्रकरणात सखोल चौकशी केली जाणार आहे. पत्रकार कायद्यांतर्गत शासन निर्देशाप्रमाणे आता पुढील कारवाई होणार असून, याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे तपास सोपवण्यात आला असल्याची माहितीही ना. सामंत यांनी दिली

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page