
मुख्यमंत्री रोजगार योजनेचे लक्ष्य पूर्ण करा..
पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना..



रत्नागिरी – 30 ऑक्टोबर : मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करावा. त्यासाठी बँकांना सज्जड दम दिला पाहिजे. युवकांना ५ लाख रुपये कर्ज देण्यासाठी बँका निकष लावून त्यांची प्रकरणे नामंजूर करतात. कर्ज प्रकरणातील ३५ टक्के अनुदानाची शासन जबाबदारी घेत असतानाच बँकांना डोकं चालवण्याची गरज नाही, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत.
उद्घाटन प्रसंगी सामंत म्हणाले, ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेंतर्गत लक्ष्य पूर्ण करण्यासाठी रत्नागिरीतील मिटकॉन संस्थेला देण्याच्या सूचना जिल्हा उद्योग केंद्राला दिल्या आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातील १३ हजार ५२६ उद्योजकांना स्वतःच्या पायवर उभे राहण्यासाठी शासनाने पाठबळ दिले आहे. युवकांना योजनेतून ३५ टक्के अनुदान दिले जाणार असून हा निकष संपूर्ण राज्यात लागू केला जाणार आहे. या योजनेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करावे. अधिकाऱ्यांची मानसिकता असेल तर यवतमाळप्रमाणे लक्ष्य पूर्ण करता येईल. त्यासाठी मुंबईतील बँकांना जसा दम दिल्यानंतर प्रलंबित १८०० पैकी १२०० प्रकरणे ४८ तासांत मंजूर झाली, तशी भूमिका घ्या, आम्ही बँकविरोधी नाही.
यंदा जिल्ह्यातील १०० टक्के प्रकरणे मंजूर होतील. लोटे एमआयडीसीत काम सुरू असलेल्या कोकोकोला कंपनीला स्थानिक पातळीवरून त्रास दिला गेला. अजून कंपनी सुरू व्हायची असताना भंगार मागायला काहीजणं गेली. त्यांनी मागील अडीच वर्षात फक्त भंगारावरच लक्ष ठेवले. कोकोकोलाच्या या ७५० कोटीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. हा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. या माध्यमातून २ हजार लोकांना रोजगार मिळेल. हीच कंपनी २५०० कोटीची गुंतवणूक करण्यासाठी तयार असून त्यांना जागा देण्यासाठी लागेल ते इंन्सेटीव्ह द्या अशा सूचना दिल्या आहेत. कोकोकोलासह रेल्वेचा कोच बनविणे असे दोन महत्वाचे प्रकल्प जिल्ह्यात सुरू होत आहेत.