सध्या राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा बोलबाला आहे. या योजनेसाठी एक कोटींहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तसंच योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रक्कमेची प्रतीक्षा लागली आहे. कधी मिळणार हे पैसे? वाचा
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक पार पडली. निवडणुकीला काही दिवस बाकी असताना ही बैठक पार पडल्यामुळं या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच राज्य सरकारची बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेतील तिसरा हप्ता कधी द्यायचा, याबाबतसुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळं लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता येणार आहे.
तिसरा हप्ता कधी येणार?-
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबरमध्ये रायगडमध्ये होणार आहे. त्यामुळं येत्या २९ सप्टेंबरला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेचा तिसरा हप्ता देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. सोमवारी मंत्रिमंडळची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
29 सप्टेंबरला मिळणार तिसरा हप्ता-
“सप्टेंबरपर्यंत आलेले अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील. अर्ज पडताळणीमुळं अद्याप लाभ प्राप्त झाला नाही. अशा अर्जदारांचे पैसे दिले जाणार आहेत. २ कोटी महिलांना लाभ दिला जाणार आहे. तिसरा हप्त्याला विलंब झाला कारण अनेक महिलांना सुरुवातीच्या दोन महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अर्ज दाखल केले, त्या अर्जाची पडताळणी आणि छाननी करण्यास विलंब झाला. त्यामुळं या योजनेचा हप्ता देण्यास उशिर झाला. मात्र, आता ही सर्व प्रक्रिया पार पडली आहे. तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल,” अशी माहितीही मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
महायुतीत ७०-७५ टक्के जागावाटप-
पुढे बोलताना तटकरे म्हणाल्या की, “महायुतीचे विधानसभा निवडणूक जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. ७०-७५ टक्के जागावाटपाचा निर्णय झालाय. प्रत्येक निवडणुकीची समीकरणं वेगळी असतात. लोकसभा निवडणुकीचा वेगळा भाग होता. विधानसभा निवडणुकीचा वेगळा भाग आहे. आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला समोरे जाणार आहोत. रायगडमध्ये सीटिंग जागेवर आमदार भरत गोगावले यांनीही प्रतिक्रिया दिली. महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार, या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.”