मेढे तर्फे फुणगुस येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने दिले जीवदान…

Spread the love

देवरूख- संंगमेश्वर तालुक्यातील मेढे तर्फे फुणगुस येथील श्री. सुभाष दत्ताराम देसाई यांच्या राहत्या घराच्या समोरील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचे आज बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले. या बिबट्याला वनविभागाच्या रेस्क्यू टिमने पिंजऱ्याच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढून जीवदान दिले. या बिबट्याची वैद्यकिय तपासणी करण्यात आल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेढे तर्फे फुणगुस येथे विहिरीत बिबट्या पडल्याची खबर पोलिस पाटील श्री. दीपक सावंत यांनी संगमेश्वरचे (देवरुख) वनपाल तौफीक मुल्ला यांना दिली. त्यानंतर वनपाल तौफीक मुल्ला यांनी रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यावेळी विहीर सुमारे २५ फुट खोल व १० फुट रुंद तसेच कठडा ३ फुटाचा असून सदरची विहीर पूर्णपणे दगडी बांधकाम केलेली आहे. विहीरीमध्ये दोन ते अडीच फुट पाणी असून त्यामध्ये बिबट्या खाली दगडाचा आधार घेऊन बसलेला दिसला.

त्यांनतर ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीमध्ये सोडल्यांनतर बिबट्याला पिजऱ्यामध्ये जेरबंद केले. ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरी बाहेर घेऊन मा. पशुवैद्यकीय अधिकारी, देवरुख श्री. डाँ. आनंदराव कदम यांचेमार्फत जेरबंद बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. हा बिबट्या हा अंदाचे ३ वर्षाचा असुन तो नर आहे. तपासणी वेळी बिबट्याच्या अंगावर ताजी अगर जुनी जखम दिसुन आली नाही. सुस्थितीत असल्याने जेरबंद बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यास योग्य असल्याचे सांगितले. सदर वेळी श्री. तौफीक मुल्ला यांनी सदर बिबट्या भक्षाचा पाठलाग करत असताना विहीरीत पडला असल्याची शक्यता असल्याचे सांगितले.

त्यानंतर विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले व रेस्कु ऑपरेशन सुरक्षित पार पाडले असून सदर कामगिरीसाठी तौफिक मुल्ला वनपाल संगमेश्वर (देवरुख) वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडूकर, अरुण माळी, रेस्कु टीम देवरुखचे दिलीप गुरव, निलेश मोहिरे, मिथील वाचासिद्ध,पोलिस पाटील श्री. दिपक सावंत, सरपंच श्री. जयंत देसाई व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा 7757975786 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने तौफीक मुल्ला वनपाल देवरुख (संगमेश्वर) यांनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page