अकरावी प्रवेशाची पहिल्या फेरीची यादी जाहीर:निम्म्यांहून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय, प्रवेशासाठी 7 जुलैपर्यंतची वेळ…

Spread the love

मुंबई- राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण संचालनालयाने यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी आज 28 जून रोजी जाहीर केली आहे.सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार 30 जून ते 7 जुलै दरम्यानच्या कालावधीत पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबतची माहिती दिली.

संचालनालयाच्या वेळापत्रकानुसार पहिली निवड यादी 26 जून रोजी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, दिवशी तांत्रिक अडचणींमुळे यादी जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे सुधारित वेळापत्रक जाहीर करत 30 जूनला पहिली निवड यादी जाहीर केली जाणार होती. मात्र, आजच यादी जाहीर झाली असून 1 ते 7 जुलै दरम्यान मिळालेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी वेळ दिला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाईटवर आपले लॉगिन करून यादी पाहावी, व पुढील प्रक्रियेची तयारी करावी.

*किती विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशाची संधी?*

पहिल्या निवडयादीमध्ये विज्ञान शाखेसाठी अर्ज केलेल्या 6 लाख 9 हजार 718 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 42 हजार 801, वाणिज्य शाखेसाठी अर्ज केलेल्या 2 लाख 23 हजार 931 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 39 हजार 602, तर कला शाखेसाठी अर्ज केलेल्या 2 लाख 31 हजार 356 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 39 हजार 791 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळालेल्यांना प्रवेश घेणे बंधनकारक

विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयासाठी नोंदवलेल्या प्राधान्यक्रमानुसार निवडयादीतील निम्म्यांहून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. 4 लाख 57 हजार 841 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. तर 77 हजार 99 विद्यार्थ्यांना दुसऱ्या, 36 हजार 901 विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असून, प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील कॅप फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार असल्याचे डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.

निकालाच्या दीड महिन्यानंतर यादी जाहीर

दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरी, अकरावीची प्रवेश प्रक्रिया मार्गी लागत नसल्याने शिक्षण विभागावर टीका करण्यात आली होती. मात्र, संचालनालयाने शनिवारीच शाखानिहाय प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली. यंदा राज्यभरातून 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रांतील विविध कॉलेजेससाठी विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवले असून, प्रवेशप्रक्रियेचा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page