नवी मुंबई- मुंबईकरांना (Navi Mumbai) बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा असलेली मेट्रो (Metro) सेवा अखेर सुरु झाली आहे . गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी कोणत्याही प्रकारचे उद्घाटन न करता मेट्रो सेवा सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी बेलापूर ते पेंधार स्थानकादरम्यान पहिली मेट्रो धावली. बेलापूर ते पेंढर दरम्यानचा मेट्रोचा पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. (Navi Mumbai Metro)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार होतं, परंतु काही कारणास्तव सातत्याने हे उद्घाटन पुढे जात होतं. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विना उद्घाटन ही मेट्रो सुरु करण्याचे आदेश दिले. १ मे २०११ रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. तेव्हापासून या मेट्रोचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. परंतु सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. १ वरील सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानक या स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली होती. पण त्यानंतरही ही मेट्रो सुरु होण्याकरिता काही केल्या मुहूर्त लागत नव्हता.
या कार्यक्रमा प्रसंगी सिडकोचे जॉईंट एमडी कैलाश शिंदे , नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबईकर या मेट्रोची वाट पाहत होते. नवी मुंबईच्या अंतर्गत भागामध्ये ही मेट्रो धावणार आहे. याचा सर्वाधिक लाभ हा तळोजा भागात राहणाऱ्या लोकांना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नवी मुंबईकरांना सुखकर प्रवास करण्यात प्रवाश्यांना सोपं होणार आहे.