
मुंबई :- अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी लांबणीवर पडली असून आता ३० जून सोमवारी जाहीर होणार आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली यादी गुरुवारी जाहीर होणार होती मात्र रात्री १० वाजता सुधारित वेळापत्रक टाकण्यात आले. संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून सुधारित वेळापत्रक अशी माहिती देण्यात आली, होती पण तीही संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आली नसल्याने रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरु होता.
दहावीचा निकाल यंदा वेळेवर जाहीर करत राज्य मंडळाने सुरुवात चांगली केली, पण त्यानंतरची अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील कामकाज पूर्णपणे नियोजनशून्य आणि गोंधळाचे ठरले आहे. वेळापत्रकात सतत बदल, विद्यार्थ्यांना अपूर्ण माहिती, यादी उशिरा, तारखांबाबतचा संभ्रम यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य सध्या गोंधळात आहे. शालेय शिक्षण विभागाचे वेळेचे भान न ठेवता घेतले जाणारे निर्णयामुळे नुसता गोंधळ उडाला आहे.
विशेष म्हणजे यंदा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी केंद्रीभूत ऑनलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश राबवला जात आहे. पण या यंत्रणेतील तांत्रिक अडथळ्यांमुळे यादीच्या घोषणेला वारंवार विलंब लागत आहे. यापूर्वी १० जून रोजी पहिली गुणवत्ता यादी येणार होती, नंतर ती २६ जून (गुरुवार) निश्चित झाली. आणि आता ३० जूनचा नवा मुहूर्त शोधला आहे.
बुधवारी माध्यमिक संचालक महेश पालकर यांनी गुरुवारी सकाळी अखेरचा निर्णय सकाळी ११ पूर्वी जाहीर करू असे सांगितले होते. पण प्रत्यक्षात तीनच्या नंतर विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा केली आणि रात्री ९ पर्यंत नवे वेळापत्रकही जाहीर केलेले नुसता गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.
महाविद्यालयांची शाखानिहाय कटऑफ माहितीत तांत्रिक अडचण आहे असे अधिकारी सांगत होते. मात्र संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी काहीच माहिती दिलेली नाही. यामुळे प्रवेश प्रक्रिये बाबत पालकांनी चिंता व्यक्त केली.