
देवरूख- राज्यातील लाखो भाविकांंचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र मार्लेश्वर या धार्मिक व पर्यटनस्थळी भाविकांनी वावरताना आपला पेहराव हा आपल्या हिंदू परंपरेला साजेसा, सुसंस्कृत, शुचिर्भुत असावा. जेणेकरुन श्री स्वयंभू महादेवाचे दर्शन घेताना मंदिर परिसरातील वातावरणात आपल्याला लाभलेला सांस्कृतिक वारसा व मंदिर परिसराचे पावित्र्य टिकवणारा असेल, तरी भाविकांनी अंगभर वस्त्र परिधान करूनच श्री स्वयंभू मार्लेश्वराचे दर्शन घ्यावे, असे आवाहन श्री मार्लेश्वर देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.
विशेषत: पावसाळ्यात श्री क्षेत्र मार्लेश्वर पर्यटनस्थळी येणाऱ्या सर्व भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता श्री मार्लेश्वर मंदिर समितीने श्री देव मार्लेश्वर दर्शनाची वेळ निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहिल तसेच श्री देव मार्लेश्वराचे श्रावणी सोमवार अथवा वार्षिक धार्मिक विधी ऊत्सवावेळी त्या त्यावेळी योग्य निर्णय घेवून मंदिर भाविकांसाठी जास्त कार्यकाळ खुले राहील. तसेच श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान संबंधी धार्मिक व भौगोलिक माहिती देताना वा घेताना ती देवस्थानचे अधिकृत विश्वस्त व देवस्थान समिती यांचेकडून घेवून ती प्रकाशित करण्यात यावी. तसेच देवस्थानच्या समिती व्यतिरिक्त इतरांनी दिलेली माहितीची खातरजमा न करता सोशल मिडियाद्वारे चुकीची प्रसारित करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.