नवीदिल्ली- भारतीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं. मिझोराममधून १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी केली जाणार आहे.
मिझोराम विधानसभा निवडणुकीचं मतदान ७ नोव्हेंबर घेतलं जाणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान तर १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतलं जाणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेश- १७ नोव्हेंबर, राज्यस्थान -२३ नोव्हेंबर आणि तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे, याबाबतची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पाचही राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. ५ डिसेंबरपर्यंत या पाच राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. २०२३ च्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ६७९ विधानसभा मतदारसंघात सुमारे एक लाख ७७ हजार मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. शिवाय पाच राज्यांच्या ९४० हून अधिक आंतरराज्य सीमेवरील चेक पोस्ट्सवर बेकायदेशीर रोकड, दारू, मोफत वस्तू आणि ड्रग्ज वाहतुकीच्या कोणत्याही सीमापार हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास आम्ही सक्षम आहोत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.