जनशक्तीचा दबाव चिपळूण प्रतिनिधी- चिपळूण मधील रामतीर्थ तलावाला पुनरूज्जीवन व सौंदर्यकरणासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री कार्यालयाने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना दिले आहे. त्यामुळे यासाठी आमदार शेखर निकम यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
रामतीर्थ तलाव हा पुरातनकालीन तलाव आहे. त्यामुळे तो शहराचे महत्व अधोरेखित करतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तलावाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे त्याला नवसंजीवनी देण्याची मागणी अनेक वर्षापासून नागरीकांमधून होत आहे. त्यामुळे मध्यंतरी काही संस्थांच्या माध्यमातून नगर परिषदेने तसा प्रयत्नही केला. मात्र त्याला तितकेसे यश आले नाही.
त्यामुळे आमदार निकम यांनी यासाठी पुढाकार घेत या तलावाच्या कामासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यात या कामाला केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत तत्वता मान्यता दिली असून निधी उपलब्ध करण्यी मागणी केली होती.
त्यानुसार उपमुख्यमंत्री कार्यालयाने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवाना ५ कोटी रूपयांचा निधी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या निधीतून पुनरूज्जीवन व सौंदर्यकरण केले जाणार असल्याने या तलावा सौंदर्य खुलणार आहे.