
देवरूख- संपुर्ण राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वराच्या वार्षिक यात्रोत्सवाला उद्या शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. हा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी दि. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. तर दि. १५ रोजी मार्लेश्वर आणि गिरिजादेवीचा कल्याणविधी (विवाह) सोहळा संपन्न होणार आहे.
संंगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरापासून सुमारे १८ किमी अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील कडेकपारीत निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू श्रीदेव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. देवस्थानच्या समोरच बारमाही वाहणारा धारेश्वर धबधबा आहे. मार्लेश्वर देवस्थान निसर्गरम्य ठिकाणी वसले असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो भाविक मार्लेश्वरच्या दर्शनासाठी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री येत असतात. तसेच पर्यटकही येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येथे दाखल होत असतात. राज्यशासनाने मार्लेश्वर तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषीत केले आहे.
मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव दरवर्षी मकरसंक्रांतीला साजरा होत असतो. या वार्षिक यात्रोत्सवाचा प्रारंभ प्रथेप्रमाणे आंगवली मठातून होत असतो. यामध्ये दि. १२ रोजी आंगवली मठात मार्लेश्वर देवाचा मांडव घालणे, दि. १३ रोजी आंगवली मठात देवाला हळद लावणे व घाणा भरणे, दि. १४ रोजी सायंकाळी मठात यात्रा, दिंड्या, कावड, पालख्यांचे आगमन, कल्याणपुर्व विधी व रात्री १२ वा. मार्लेश्वर पालखीचे शिखराकडे प्रयाण, दि. १५ रोजी. श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरिजादेवी यांचा मार्लेश्वर शिखर येथे विवाहसोहळा, दि. १६ रोजी. मारळ येथे मार्लेश्वराची वार्षिक यात्रा, दि. १७ रोजी आंगवली गावात मार्लेश्वर पालखीचे घरोघरी दर्शन व दि. १८ रोजी आंगवली मठात घरभरणीने मार्लेश्वर यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यान, मार्लेश्वराच्या वार्षिक यात्रोत्सव काळात देवरूख आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देवरूख पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.