मुंबई । राजकीय वर्तुळात लवकरच मोठी युती होणार असल्याच्या चर्चेचे वारे वाहत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भीमशक्ती आणि शिवशक्ती लवकरच एकत्र येणार आहे. तसेच लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याचेही म्हटले जात आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या (२३ जानेवारी) होणार असल्याचे समजते. या युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र या युतीचा फायदा कोणाला होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अलीकडेच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर दोन पक्षाच्या युतीबाबत चर्चांना मोठी हवा मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या (२३ जानेवारी) दादरमधील आंबेडकर हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन, या युतीबाबत मोठी घोषणा होणार आहे. म्हणून, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दिग्गज नेते लवकरच एकत्र दिसण्याची शक्यता आहे.