९ ऑक्टोबर/मुंबई : संभाजी नगर व नांदेड येथे घडलेल्या दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. अशा दुर्घटनांकडे पाहताना सर्व पक्षांनी, मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्ष असोत, राजकारण विसरून सर्वांनी एकत्र येऊन अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये. एखादी घटना घडल्यावर तिला कायमस्वरूपी राजकीय वलय देऊन राज्याच्या प्रमुखांना व उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाचे नेते करत आहेत, ते योग्य नाही.
आरोग्य यंत्रणांमध्ये जर काही त्रुटी विरोधकांना आढळल्या असतील. तर त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, त्याबद्दल काही सूचना असतील तर त्या मुख्यमंत्र्यांकडे मांडाव्यात. फक्त दौरे करून व पत्रकार परिषदा घेऊन सरकारला बदनाम करण्याचे काम करू नये, असे आवाहन शिवसेना उपनेते, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना केले केले.
मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, कोविड काळात अनेकांना सरकारविरोधात राजकारण करण्याची संधी होती. आम्ही सुद्धा राजकारण करू शकलो असतो. त्यावेळेस एकीकडे आम्हीच कोविड विरोधात सर्वोत्कृष्ट काम करत आहोत, असे तत्कालीन मुख्यमंत्री सांगायचे, तर दुसरीकडे देशात ५,३२,००० मृत्यू झालेत, त्यातील १,४८,५६१ महाराष्ट्रात झालेत. ही देखील माहिती आहे. कोविड काळात जेव्हा फिरायचे होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री घरी बसून फेसबुक लाईव्ह करायचे आणि आता मात्र दौरे करत आहेत, असा टोला देखील उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना लगावला.