कोल्हापूर : दुधाचे फॅट तपासणीसाठी २० मिलीऐवजी ५० ते १०० मिली दूध घेतले जात आहे. दुधाचे फॅट किंवा एस.एन.एफ. न तपासताच दूध खरेदी केली जाते, अशा करवीर तालुक्यातील चार, शिरोळमधील पाच आणि पन्हाळा तालुक्यातील सात अशा एकूण १६ संस्थांना (Milk Dairy) कामाकाजामध्ये तत्काळ बदल करावा. अन्यथा, संस्थांवर प्रशासक नियुक्त केला जाईल, असा इशारा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी (Dairy Development Officer) प्रकाश आवटे आणि सहकारी संस्था (दुग्ध) सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी दिला आहे.
दानोळी (ता. शिरोळ) येथील एका दूध संस्थेत फॅट आणि एस.एन.एफ.ची तपासणी केली जात नाही. उत्पादकांकडून येणारे दूध हे लिटरप्रमाणे संकलन केले जाते. शेतकऱ्यांना त्यानुसारच पैसे दिले जात आहेत. मात्र, शासनाने दिलेल्या प्रमाणानुसार दूध संकलन होत नसल्याने उत्पादकांना मोठा फटका बसत आहे.
करवीर तालुक्यात भामटे गावातील दूध संस्थेत केवळ फॅटच पाहून दर दिला जात आहे. याठिकाणी एस.एन.एफ. पाहिले नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात ज्या-ज्या दूध संस्थांबाबत तक्रारी येतील त्यांची तपासणी होणारच आहे. मात्र, ज्यांची तक्रार येणार नाही तरीही आमच्या कार्यालयाकडून त्याची तपासणी केली जाणार आहे.
या संस्थांना नोटीस
- शिरोळ तालुका : जनसेवा दूध संस्था आणि वसंतदादा दूध संस्था (दोन्ही संस्था दानोळी). दिरबादेवी, रत्नदीप आणि महादेवी पद्मादेवी ( उदगाव).
- पन्हाळा तालुका : माउली, श्रीकृष्ण, महादेव आणि शिवपार्वती (सर्व संस्था मरळी). शिवशाही, छत्रपती जिजाऊ महिला आणि दत्त (मल्हारपेठ).
- करवीर तालुका : राजर्षी शाहू, राम आणि जोतिर्लिंग दूध संस्था (सर्व संस्था भामटे). हनुमान दूध संस्था (आरळे)