कोकणातील काही पक्षांचे नेते भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची साथ सोडू लागले आहेत.
*रत्नागिरी :* कोकणात शिवसेना ठाकरे गटाला सुगीचे दिवस येण्यास सुरुवात झाली आहे. कोकणातील अनेक मोठे नेते ठाकरे गटात प्रवेश करीत आहेत. तर अनेक नेते आज ही शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेशासाठी इच्छुक आहेत. लवकरच कोकणात शिवसेना ठाकरे गटाची मशाल या विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला भारी पडण्याची शक्यता राजकिय वर्तुळातून वर्तविली जात आहे.
महाराष्ट्र राज्यात ठाकरेंची शिवसेना फुटल्यावर अनेक शिवसेना नेते विभागले गेले. काही शिवसेना शिंदे गटात गेले. तर काही ठाकरेंच्या शिवसेने बरोबर एकनिष्ट राहिले. मात्र आज शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू झाली असल्याचे पहायला मिळत आहे. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेला देखील मोठा फटका सहन करावा लागला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बरोबर आलेला एकही आमदार आणि खासदार निवडणुकीत हारणार नाही याची हमी दिली होती. तरीही भावना गवळीं सारख्या खासदारांना लोकसभेत हार पत्करावी लागली होती. कालांतराने यांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र लोकसभेच्या लागलेल्या निकालानंतर शिंदेच्या शिवसेनेला चांगलीच धडकी भरलेली असताना, आता त्याचे परिणाम या विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात पक्षांतर बदलाचे वारे वहात असताना ते वारे आता कोकणात देखील शिरले आहे. कोकणातील काही पक्षांचे नेते भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची साथ सोडू लागले आहेत. नुकत्याच भाजपमधील नारायण राणेंचे समर्थक राजन तेलींसह अनेक कार्यकर्ते आणि नेते पुन्हा शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले आहेत. त्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते परशुराम उपरकर देखील ठाकरे गटात लवकरच दाखल होणार आहेत. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात या राजकिय उलथापालथीचा मोठा फटका भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेला या विधानसभेत बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात देखील ठाकरेंच्या शिवसेनेवर विश्वास ठेवणारा मोठा मतदार वर्ग आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार उदय सामंत यांना मोठा रोष या निवडणुकीत पत्करावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात भाजपाचे माजी आमदार बाळ माने जर शिवसेना ठाकरे गटात आल्यास सामंत यांना मित्र पक्षाकडून मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधानसभा निवडणुकीच्या आधीच कोकणात मोठे पक्षांतराचे वहाणार यात काहीच शंका नाही, असेच दिसून येऊ लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपले चांगलेच बस्तान बसविलेले आहे. मात्र आता त्यांना ही त्यांची राजकिय कारकीर्द धोक्यात असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पुन्हा ठाकरे यांच्या शिवसेनेचे दरवाजे ठोठावले असल्याचे बोलले जात आहे. मात्र गद्दारांना पुन्हा थारा नाही असे धोरण ठाकरे गटाने घेतल्याने सामंत यांच्या साठीचे दरवाजे बंद झाले आहेत. मात्र उदय सामंत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार आणि अजित पवार गटाच्या देखील संपर्कात असल्याची चर्चा आहे. मात्र सर्वच दारे सामंत यांच्यासाठी बंद झाल्याने त्यांना आता रत्नागिरीत ‘एकला चलो रे ‘ असेच म्हणावे लागणार असल्याची ही चर्चा आहे.
कोकणात आधी पासूनच शिवसेना ठाकरे गटाला मतदारांची सहानुभुती असल्याने कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मात्र नेत्यांच्या पक्षांतरा नंतर कोकणात कोणत्या राजकिय घडामोडी घडणार याकडे सर्वच मतदारांचे आता लक्ष लागून राहिले आहे. येणा-या विधानसभा निवडणुकीचा निकालच कोकणातील राजकीय पक्षांची दिशा आणि दशा ठरवणार आहे हे तितकेच नाकारता येणार नाही.