नवी दिल्ली – 14 ऑक्टोबर – दहशतवाद हा जगासमोरील सर्वात मोठे आव्हान असून याची झळा बसली नाही असा एकही देश नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) रोजी केले.
देशाची राजधानी दिल्लीतील द्वारका भागात तयार झालेले अत्याधुनिक ‘यशोभूमी’ या ठिकाणी आयोजित ‘पी-२०’ शिखर परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिल उद्गार काढले. ‘जी-२०’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांची शिखर परिषद नुकतीच यशस्वीपणे पार पडली. यानंतर ‘जी-२०’ देशांतील संसदेच्या अध्यक्षांची शिखर परिषद ‘पी-२०’ या नावाने भारतात भरविण्यात आली. दिल्लीत सुरू असलेली बैठक ही नववी परिषद आहे.
इस्राईलने हमासविरूध्द छेडलेल्या युध्दाचे नाव न घेता नरेंद्र मोदी म्हणाले की, दहशतवादाने या जगापुढे खूप मोठे आव्हान उभे केले आहे. दहशतवादाच्या मुद्यावर वेगवेगळ्या मतांमध्ये दुभंगलेले देश याचे समाधान काढू शकत नाही. ही वेळ शांतता आणि बंधुभावाचा मार्ग स्वीकार करून एकजुटीने पुढचे पाउल गाठण्याची आहे. ही वेळ विकासाची आणि कल्याणाची आहे. आपल्याला जागतिक पातळीवर निर्माण झालेले अविश्वासाचे संकट दूर करून मानवतावादी केंद्रित विचारसरणीने पुढे जावे लागणार आहे.
मोदी म्हणाले की, सुमारे २० वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेला लक्ष्य केले होते. त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होते आणि खासदारांना ओलीस ठेवून त्यांना संपवण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता. आता जगालाही कळू लागले आहे की दहशतवाद हे किती मोठे आव्हान आहे. दहशतवाद कुठेही असो, कोणत्याही स्वरूपात असो, तो मानवतेच्या विरोधात असतो. अशा स्थितीत दहशतवादाबाबत सर्वांनी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.
जागतिक पातळीवर दहशतवादाची व्याख्या करण्याबाबत एकमत न होणे ही अत्यंतु दुर्दैवी बाब आहे. सर्व देश या मुद्यावर एकमत होतील याची प्रतिक्षा अजूनही संयुक्त राष्ट्रसंघाला आहे. याच गोष्टीचा फायदा मानवतेचे शत्रू घेत आहेत. दहशतवादाविरोधात आपण कसे काम करू शकतो, याचा विचार जगभरातील प्रतिनिधींना करावा लागेल, असेही मोदी म्हणाले.