भीषण अपघात: कारचा दरवाजा लॉक झाला अन् चिमुकल्यासह ८ जणांचा भररस्त्यात होरपळून मृत्यू

Spread the love

उत्तर प्रदेशातील भोजीपुराजवळ शनिवारी रात्री एका कारला भीषण अपघात झाला. बरेली-नैनिताल महामार्गावर ट्रकने दिलेल्या धडकेत एका लहान मुलासह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित सर्वजण एका लग्नाला उपस्थित राहून आपल्या घरी परतत होते. दरम्यान, ट्रकने धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त कारने पेट घेतला आणि कार सेंट्रली लॉक असल्याने सर्वांचा होरपळून मृत्यू झाला.

ट्रकने धडक दिल्यानंतर कारचा टायर फुटला आणि कार महामार्गाच्या विरुद्ध बाजूला पलटी झाली. उत्तराखंडमधून रेती घेऊन आलेल्या या ट्रकने कारला काही अंतर फरपटत नेलं. ही कार मारुती सुझुकी एर्टिगा असल्याचं सांगण्यात येत आहे.

या घटनेची अधिक माहिती देताना बरेलीचे एसएसपी घुले सुशील चंद्रभान यांनी सांगितलं की, भोजीपुराजवळ बरेली-नैनिताल महामार्गावर भीषण अपघात झाला. एका ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात कारला काही अंतर ओढत नेल्याने कारने पेट घेतला. कार सेंट्रली लॉक होती, त्यामुळे कारने पेट घेतल्यानंतर प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. यामुळे कारमधील सर्वांना आपला जीव गमवावा लागला. मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये ७ प्रौढांसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील कारवाई केली जात आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page