मुंबई गोवा हायवे वरती हातखंबा येथे टँकरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू, मुंबई गोवा हायवे बनजा मृत्यूचा महामार्ग….

Spread the love

रत्नागिरी :  मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील हातखंबा येथील दर्गाजवळ पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शिशिर रावणंग या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.  शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
      
रत्नागिरी निवळी येथील शिशिर शांताराम रावणंग (वय ३६ , निवळी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकीला धडक देणारा टँकर हा मुंबई गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या एका कंपनीचा होता. शिशिर यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगात आलेल्या या टँकरने (क्र. एमएच ०५  बीए ३६७७ ) जोरदार धडक दिली. त्या धडकेत शिशिर दुचाकीवरून रस्त्यावर फेकला गेला. त्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. अपघातात रस्त्याच्या मधोमध पडलेल्या शिशिरला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. या अपघातानंतर टँकर चालक सोनू महतो (रा. झारखंड) हा फरार झाला होता.
     

महामार्गावरील हातखंबा दर्गाजवळ तीव्र वळण व उतार असल्याने अनेक अपघात होत असतात, मात्र या परिस्थितीचा विचार न करताच अनेक वाहनधारक गाड्या भरधाव मारत असतात. त्यातूनच हा अपघात घडला आहे. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने, जवळच राहणाऱ्या आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यावेळी शिशिर गंभीर जखमी होऊन निपचित पडलेला होता. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तेथे दाखल करताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताची माहिती हातखंबा, निवळ तसेच रत्नागिरी शहर परिसरात पसरली असता, शिशिरच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. संतप्त नागरिकांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी केली.
    
शिशिर हा यापूर्वी रत्नागिरीत विवो कंपनीमध्ये क्षेत्रीय व्यवस्थापक म्हणून काम करत होता. अलीकडेच तो एअरटेल कंपनीत याच पदावर कामावर रुजू झालेला होता. शुक्रवारी रात्री ८ .१५  वाजता तो लांजा येथील आपले काम संपवून निवळी येथील आपल्या घरी निघाला होता. यावेळी हातखंबा येथील दर्गाजवळ ही घटना घडली. अधिक तपास हे. कॉ. रुपेश भिसे करत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page