संगमेश्वर तालुका स्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा बुरंबी येथे उत्तम नियोजनाने उत्साहात संपन्न!…
श्रीकृष्ण खातू / धामणी- जिल्हास्तरावर खेळण्यासाठी संघ तालुक्यातून पाठवताना प्रत्येक पंच व मार्गदर्शक शिक्षक यांनी निपक्षपातीपणाने योग्य निवड करून आपल्या तालुक्याचे नाव जिल्ह्याला लौकिक करण्यासाठी
प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूला सराव देऊन खेळातील योग्य क्लुप्त्या व कौशल्य समजावून सांगून खेळाडूला खेळात पारंगत करून जिल्हास्तरावरील स्पर्धेत आपल्या तालुक्याचा संघ विजयी झालाच पाहिजे अशा मानसिकतेने प्रत्येक खेळाचा संगमेश्वर तालुक्याचा संघ तयार करा अशा प्रकारचे मनोगत व्यक्त करतांना संगमेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांनी संगमेश्वर तालुकास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२४ बुरंबी हायस्कूल येथे उदघाटन प्रसंगी सर्व पंच ,मार्गदर्शक शिक्षक तसेच उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
तालुक्यातचे सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदेे यांनी खेळाचे जीवनातील महत्व, सांघीक, मधून मित्रत्वाची भावना जपा. स्पर्धा करतांना खेळ समजून खेळा, कुठलाही आकस मनात ठेऊ नका. कौशल्य पणाला लावून शाळेचे नाव उज्वल करा अशाप्रकारे मार्गदर्शन केले.
व्यासपिठावर उपस्थित असलेले मान्यवर सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद कुमार शिंदी गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी सरोज आखाडे, शशिकांत त्रिभुवने, तानाजी नाईक तसेच समीर काबदुले, बुरंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक वीरकर, संस्था पदाधिकारी, राजाराम गर्दे, शरद बाईत, यांच्या हस्ते व उपस्थितीत स्पर्धेचं उदघाटन करण्यात आले.
सदर प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी बुरंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश विरकर यांनीही सर्व खेळाडूंना खेळातील आपले कौशल्य दाखवून आपल्या शाळेचे व आपले नाव रोशन करा, नियमांचा वापर करा, पंचायत समितीकडील अशा उपक्रमाला आमची शिक्षण संस्था व आमचे हायस्कूल याकामी मदत करण्यासाठी सदैव तयार असून त्याचा खेळाडूंनी लाभ घ्यावा असे प्रोत्साहनपर मनोगत मुख्याध्यापक विरकर यांनी व्यक्त केले.
सदर स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय पंच सुरेंद्र रणसे, संदेश सावंत, विलास गुरव, नथुराम पाचकले, सायली सावंत, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, धोंडू करंबळे, कर्मचारी सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, शिक्षक बंधू भगिनी ग्रामस्थ पालक खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते.
दोन दिवशी स्पर्धा निकाल……सांघिक मोठा गट
कबड्डी मुलगे …………प्रभाग साखरपा विजेता
कबड्डी मुली…..प्रभाग माखजन विजेता
खो खो मुलगे……..प्रभाग संगमेश्वर विजेता
खो खो मुली……प्रभाग देवरुख नं.१ विजेता
लंगडी मुली…………..प्रभाग देवळे विजेता
क्रिकेट मुलगे………….प्रभाग माखजन विजेता
सांघिक लहान गट…
कबड्डी मुलगे ……….प्रभाग देवरुख नं.२विजेता
कबड्डी मुली. ……….प्रभाग कडवई विजेता
खो खो मुलगे. …….प्रभाग देवरुख नं.२ विजेता
खो खो मुली. ……….प्रभाग कडवई विजेता
लंगडी मुली. ………..प्रभाग देवळे विजेता
तसेच वैयक्तिक स्पर्धा …..लांब उडी, उंच उडी, धावणे,गोळा फेक ,थाळी फेक अशा खेळातून उत्तम कौशल्य दाखवलेल्या
खेळाडूंचे प्रत्येकी प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यात आले.
विजयी खेळाडूंना योग्य बक्षिसे मान्यवरांचे हस्ते देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
जनरल चँपियन शिल्ड – प्रभाग देवळेंनी पटकावली.
यासाठी लागणारी सर्व बक्षिसे आमदार शेखर निकम साहेब पुरस्कृत होती.यासाठी बुरंबाड शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र निकम यांच्या प्रयत्नातून प्राप्त झाली होती .
या दोन दिवसीय स्पर्धा संपन्न होण्यासाठी मुचरी केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश बावधने शिक्षक प्रकाश ओकटे, संजय जाधव, कृष्णा करंजळकर, जनार्दन गेल्ये, संतोष कांबळे, राजेश कांबळे,उमेश कोकरे, हर्षल गुरव, या मंडळींनी स्पर्धेपूर्वी चार ते पाच दिवस खूप मेहनत घेऊन तसेच सूक्ष्म नियोजन करून, आमच्या मुचरी केंद्रात संपन्न होणाऱ्या स्पर्धा ही जणू आपली जबाबदारी समजून
उन्हाची व जेवणाची पर्वा न करता अथक परिश्रम घेतले.या बद्दल शिक्षण विभागाने शाबासकी दिली.
या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तमरित्या प्रवीण सावंत यांनी करून या कार्यक्रमास रंगत आणली. तसेच आभार व समारोप शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने यांनी करुन सर्वाना धन्यवाद दिले.