मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उबाठाच्या आमदारांना अपात्र करावे, अशी विनंती याचिका शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी केली आहे. व्हिप न पाळणाऱ्या उबाठा आमदारांविरोधात आम्ही अपत्रातेची याचिका दाखल केली होती. त्यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती याचिका माननीय उच्च न्यायालयात केली असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्यामुळे खरी शिवसेना आम्हीच आहोत. उबाठा शिवसेना नाही. ठाकरे गटाच्या आमदारांनी आमच्या व्हिपचे पालन केलेले नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी अपात्रतेचा निर्णय झाला नाही तर ही याचिका निष्प्रभ ठरले. त्यामुळे निवडणुकीपूर्वी उच्च न्यायालयाने अपात्रतेवर निर्णय द्यावा, असे आमदार गोगावले यांनी म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्षांनी आधीच दिला निकाल
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात शिवसेनेतील सर्व आमदारांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. या वेळी झालेल्या सत्ता संघर्षात दोन्ही गटाने एकमेकांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली होती. या, प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला असून आता त्यावर सर्वोच्च न्यायालयातून निकाल यणे बाकी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या संदर्भात काय निर्णय घेतो? हे पाहावे लागेल.