
बुलढाणा- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी टोकाची भूमिका घेत आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला दिला होता. मागील दोन दिवसांपासून तुपकर हे भूमिगत झाले होते. आज अचानक पोलीस वेशभूषेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले आणि अंगावर रॉकेल ओतून घेतलं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. मोठ्या संख्येनं रवीकांत तुपकर हे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहे. पोलिसांचा वेश धारण करून रविकांत तुपकर हे जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या कार्यकर्त्यांसह धडकले आणि त्यांनी अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न या ठिकाणी केला.
विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही, त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने आंदोलन करत आहे. मध्यंतरी मुंबईच्या जलसमाधी आंदोलनाची दखल सरकारने घेतली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून पाने पुसल्या गेली. त्यामुळे संतापलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता.