पुणे- चरस हा अमली पदार्थ बाळगणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा एनडीपीएसचे विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी सुनावली आहे.
हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. शैक्षणिक हब आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात बाहेरून अनेक तरुण येतात. झटपट पैसे कमविण्यासाठी तरुण अशा गुन्ह्यात अडकल्यास समाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजात योग्य संदेश जाण्यासाठी अशा गुन्ह्यात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता वामन कोळी यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे
सुरेश गणपती वडत्या (वय ३२,रा. तेलंगणा) असे त्याचे नाव आहे. हडपसर, गाडीतळ येथील सार्वजनिक रस्त्यावर ८ ऑगस्ट २०१६ रोजी पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्याकडून १ किलो ६७५ ग्रॅम वजनाचा ४ लाख ८६ हजार रुपये किमतीचा चरस जप्त केला होता. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता वामन कोळी यांनी सात साक्षीदार तपासले. शिक्षेसाठी जप्त केलेला तो अमली पदार्थच आहे, हे सिद्ध करणारा रासायनिक तपासणी अहवाल आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष महत्त्वाची ठरली.