*ठाणे गुन्हे शाखेच्या 5 युनिटच्या पथकानं छापा टाकून कल्याण-भिवंडी मार्गावरील रांजनोली गावाच्या हद्दीत असलेल्या ‘पारो’ ऑर्केस्ट्रा बार ॲन्ड रेस्टॉरंटच्या बार मॅनेजर, 5 पुरुष वेटरसह 13 (बारबाला) महिला वेटर आणि 11 ग्राहक असा 29 जणांना ताब्यात घेतलं.*
*ठाणे :* एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात बेकायदा बार, ढाबे , हुक्का पारर्लवर धडक कारवाई सुरु असतानाच, कल्याण-भिवंडी मार्गावरील रांजनोली गावाच्या हद्दीत असलेल्या ‘पारो’ ऑर्केस्ट्रा बार ॲन्ड रेस्टॉरंटच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपड्यांवर बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत असतानाच ठाणे गुन्हे शाखेच्या 5 युनिटच्या पथकानं छापा टाकून बार मॅनेजर, 5 पुरुष वेटरसह 13 (बारबाला) महिला वेटर आणि 11 ग्राहक असा 29 जणांना ताब्यात घेतलं. मात्र नियमाचं उल्लंघन करणाऱ्या ‘पारो’ बारवर स्थानिक कोनगाव पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) शशिकांत दोडके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांची ठाणे पोलीस कंट्रोल रुममध्ये तडकाफडकी बदली करण्यात आल्यानं पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
*छापेमारीत काय आढळलं :*
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण-भिवंडी मार्गवरील रांजनोली गावाच्या हद्दीत ‘पारो’ बार आहे. या बारमध्ये शासनाच्या नियमांचं उल्लंघन करुन बारबाल ग्राहकांशी उशिरापर्यत अश्लील चाळे करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या 5 युनिटच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारवर 6 जुलै रोजी ‘पारो ऑर्केस्ट्रा बार अँड रेस्टॉरंटच्या नावाखाली मॅनेजर, बारबाला आणि वेटर आदींनी आपसात संगनमत करुन ग्राहकांच्या जवळ उभं राहून अंगावर रंगी बेरंगी पोशाखात तोकडे व अंग दर्शविणारे कपडे परीधान केले होते. शिवाय ग्राहकाच्या जवळ जावून दारुचा ग्लास भरुन देवुन ग्राहकांना हेतु पुरस्सर अश्लील हावभाव करुन ग्राहकांची नितीभ्रष्ट करीत असतांना 11 बारबाला मिळून आल्या असून ग्राहकही महिला वेटर यांना हातवारे करुन प्रोत्साहीत करीत होते, असं छापेमारीत पोलीस पथकाला आढळल्यानं सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
*29 जणांवर गुन्हे दाखल :*
दरम्यान, बारचा मॅनेजर संतोषकुमार राजदेव दांगी, 11 (बारबाला) महिला वेटर, तसंच पुरुष वेटर 5 आणि 11 ग्राहक अशी गुन्हा दाखल झालेली 29 जण आहेत. या सर्वांवर ठाणे गुन्हे शाखेच्या 5 युनिटच्या पथकातील हवालदार विजय काटकर यांच्या तक्रारीवरुन कोनगाव पोलिस ठाण्यात कलम 296 (अ) 3, (5) सह म. पो. कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 35 (03) प्रमाणे नोटीस दिली आहे. तर दुसरीकडे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत घटनेच्या दिवशी कर्तव्यावर तैनात असलेल्या कोनगाव पोलीस ठाण्याचे एपीआय दोडके यांचं 8 जुलै रोजी निलंबन करण्यात आलं. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची ठाणे पोलीस कंट्रोल रुममध्ये बदली करण्यात आल्याची माहिती भिवंडी झोनचे पोलीस उपआयुक्त डॉ श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे. तर कोनगाव पोलीस ठाण्याचा तात्पुरता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा कार्यभार शांतीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अडूरकर यांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
*परिसरात जवळपास 23 बार :*
विशेष म्हणजे निलंबन झालेले दोडके हे तीन महिन्यांपूर्वीच बुलठाणा जिल्ह्यातून एपीआयचे प्रमोशन होऊन त्यांची कोनगाव पोलीस ठाण्यात बदली झाली होती. भिवंडी महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातील मुंबई-नाशिक महामार्गावर व गोदाम पट्यात सुमारे 23 च्या जवळपास बार आहेत. त्यामध्ये लैला, देवदास, पारो, किनारा, सिंगर, लवली, बॉम्बे पेलेस, नाईट लव्हर्स, सपना अप्सरा, ड्रीम लव्हर्स, सम्राट, सुकुर, शिल्पा, सिल्वर पेलेस, इन्जोय, डब्लूडब्लूएफ, आशीर्वाद, सिरोज, संगीत आदी ऑर्केस्टा-डान्स बारचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी भिवंडीतील एका डान्स बारमधील बारबालवर पैश्याची उधळण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर उशिरापर्यत सुरु असलेल्या ऑर्केस्टा बारवर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. तरी देखील पुन्हा उशिरापर्यत ऑर्केस्टा बार सुरु राहत असल्याचं ठाणे गुन्हे शाखेच्या 5 युनिटच्या पथकानं केलेल्या छापेमारीतून समोर आलं आहे.