
संगमेश्वर : तालुक्यातील असावे बौद्धवाडी येथील सुनील सखाराम मोहिते या ५९ वर्षीय इसमाने मद्यधुंद अवस्थेत स्वतःच्या मानेला लोखंडी केबलने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील असावे बौद्धवाडी येथील सुनिल सखाराम मोहिते हा इसम मद्य व्यसनी होता. त्याने मद्यपान करून सून निकिता निकेश मोहिते हिच्याबरोबर वाद घातला. यावेळी भाजी कापण्याची सूरी हातात घेऊन तो सुनेच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला. या झटापटीत सूरीचे टोक निकिता हिच्या गालावर लागून ओरखडा पडला. याची तक्रार निकेश आणि त्याची पत्नी निकिता पोलीस ठाण्यात करणार होते. या भीतीने सुनिल मोहिते याने १३ एप्रिल च्या रात्री ११.३० ते १४ एप्रिल पहाटे पहाटेच्या दरम्याने घरासमोरील पडवीतील लाकडी वाशाला लोखंडी केबल अडकवून स्वतःच्या मानेला गळफास घेत आत्महत्त्या केली. या घटनेची फिर्याद निकेश सुनिल मोहिते याने संगमेश्वर पोलिसात दाखल केली. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उप अधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली माखजन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विवेक साळवी करत आहेत.