अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण … राष्ट्रपती मुर्मू, सोफिया कुरेशी सारख्या विद्यार्थीनी तयार व्हाव्यात –पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Spread the love

रत्नागिरी : मुलींना देखील शिक्षणाचा न्याय, हक्क मिळाला पाहिजे. ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने घेऊन, ती राबवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आपल्या राज्यामध्ये अनेक सोफिया कुरेशी निर्माण करायच्या असतील, तर अशा पद्धतीची अल्पसंख्याक, मुलींसाठीची वस्तीगृह ही गावागावांमध्ये उभी राहणं आवश्यक आहेत. भविष्यामध्ये या वस्तीगृहांमधून बाहेर पडणाऱ्या मुलींपैकी एकतरी सोफिया कुरेशी, एकतरी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासारखे नेतृत्व झालेले आपल्याला बघायला मिळेल, अशा शब्दांत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.


    

येथील थिबा पॅलेस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण कोनशिला अनावरण करुन आणि फित कापून पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते आज झाले. यावेळी आमदार किरण सामंत, माजी आमदार हुस्नबानू खलिपे, अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, प्रांताधिकारी जीवन देसाई, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर, राजन शेट्ये, प्राचार्य पी. के. देशपांडे आदी उपस्थित होते.


      

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल, आपलं पॉलिटेक्निक असेल, त्या सगळ्यात ज्या मुली शिक्षण घेत आहेत, त्या अल्पसंख्याक मुलींना वस्तिगृहाचे हे दालन पुढच्या आठ दिवसांमध्ये खुले झाले पाहिजे.  कुठच्याही परिस्थितीमध्ये हे वस्तीगृह हे फक्त माझ्या महिला भगिनींसाठी मुलींसाठीच वापरले गेले पाहिजे. आज आपण महाराष्ट्रातल्या 288 मतदार संघ जर डोळसपणे बघितले तर सगळ्यात जास्त वस्तीगृह असलेला मतदार संघ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आहे.


    

मागच्या वर्षी आपण मेडिकल कॉलेज सुरू करताना एकावेळी एक हजार विद्यार्थी हे शासनाच्या पैशांमध्ये वस्तीगृहांमध्ये राहिले पाहिजेत, अशी संकल्पना घेऊन आपण कामाला लागलो. त्याच्यासाठी मेडिकल कॉलेजची साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून कॉलेजची इमारत होत आहे. त्याच्यामध्ये देखील वस्तीगृहाचा समावेश केलेला आहे.
स्पर्धा परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याचा टक्का गेले तीन वर्ष वाढायला सुरुवात झालेली आहे. यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्रातनं अनेक विद्यार्थी शिकून बाहेर पडत आहेत. शिक्षण झालं म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही. आपण डॉक्टर झालो, म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही.  तर इंजिनिअरिंग नंतर आणि डॉक्टरकीनंतर युपीएससी, एमपीएससी करणारे देखील विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. 
एक माझी महिला भगिनी भारताच्या डिफेन्सचे नेतृत्त्व करताना आपण सोफिया कुरेशी यांना पाहिले आहे. जी फायटर प्लेन चालवते, प्रात्यक्षिक देखील जगाला दाखवलं आहे. आपल्या राज्यामध्ये अनेक सोफिया कुरेशी निर्माण करायच्या असतील तर अशा पद्धतीची अल्पसंख्याक आणि मुलींसाठीची वस्तीगृह ही गावागावामध्ये उभी राहणं आवश्यक आहेत.    
   
भविष्यामध्ये या वस्तीगृहामधून बाहेर पडणाऱ्या मुलींपैकी एक तरी सोफिया कुरेशी, एकतरी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासारखे नेतृत्त्व निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळेल ही देखील अपेक्षा व्यक्त करतो, असेही पालकमंत्री म्हणाले.
    
कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page