गुहागर : शृंगारतळी येथील महावितरणच्या शाखाअंतर्गत तीन वायरमन कर्मचाऱ्यांची अचानक बदली केल्याने गुहागर महावितरण कार्यालयामध्ये वायरमन कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले व जाब विचारला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनावर कार्यकारी अभियंता चिपळूण यांनी कोणताच निर्णय न दिल्याने सोमवारी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते.
शृंगारतळी महावितरणच्या शाखेंतर्गत काम करणारे वायरमन विश्वजीत चव्हाण, अल्पेश मोरे, किरण बेंदरकर या तिघांची तेथील अभियंता सचिन कोळेकर यांनी गावातर्गत बदली केली. मात्र, ही बदली अन्यायकारक असल्याचे वायरमन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. एका शाखेतून दुसऱ्या शाखेत अशा बदल्या नुकत्याच झाल्या असताना शाखेतील गावांतर्गत झालेली बदली ही वायरमन यांना मान्य नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत उप कार्यकारी अभियंता (गुहागर) सुनील सुद यांची सर्व वायरमन यांनी भेट घेतली. दुपारपर्यंत चर्चा सुरू होती. मात्र, कर्मचाऱ्यांचे समाधान न झाल्याने दुपारनंतर तालुक्यातील सुमारे चाळीस वायरमन कर्मचाऱ्यांनी गुहागर मुख्य कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले.
कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार दोन्ही बाजू ऐकून घेऊन चिपळूणचे कार्यकारी अभियंता अनिल गेडाम यांच्याकडे या प्रकरणी मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत कार्यकारी अभियंता यांनी कोणताही निर्णय दिलेला नव्हता. यामुळे कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या गुहागर कार्यालयामध्ये हजेरी लावली.
शृंगारतळीतील शाखा कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक अभियंता सचिन कोळेकर यांनी तीन कर्मचाऱ्यांची केलेली बदली अन्यायकारक आहे. वीज वसुलीच्या नावाखाली बदली केली असेल तर गेली दोन वर्षे गुहागर तालुक्यातील वीज वसुली शंभर टक्के आहे. त्यामुळे असे असताना कर्मचाऱ्यांची केलेली बदली ही अन्यायकारक आहे. प्रभारी सहाय्यक अभियंता सचिन कोळेकर हे वीज वसुली संदर्भात वायरमन यांना कोणते सहकार्य करत नाहीत. मात्र अंतर्गत बदली करून एक प्रकारे कर्मचाऱ्यांमध्ये शांतता बिघडवण्याचे काम करत आहेत. शाखेंतर्गत बदली झाल्यावर नवीन कर्मचाऱ्याला तेथील फिडर लाईन समजून घेण्यासाठी सहा महिने जातात. मात्र बदली होऊन दीड महिने झाले असतानाच पुन्हा बदली करणे अन्यायकारक असल्याचे वर्कर्स फेडरेशन रत्नागिरी मंडळचे सचिव महेश डिंगणकर यांनी सांगितले.
यावेळी वर्कर्स फेडरेशन रत्नागिरीचे उपसचिव संतोष आंबावकर, संचालक साई कांबळे आदींसह वायरमन उपस्थित होते.