दुसर्‍यांच्या सुखाचा हेवा वाटतो? थांबा! ‘ही’ मार्मिक कथा एकदा वाचाच!

Spread the love

आपण सोडून सगळेच सुखी आहेत असे वाटू लागते, तेव्हा मनाचा हा भ्रम दूर करण्यासाठी पुढे दिलेली कथा कायम लक्षात ठेवा!

दुसर्‍यांची प्रगती पाहून अनेकदा आपल्या मनात असूया निर्माण होते, विशेषत: सध्याच्या सोशल मीडिया काळात प्रत्येक जण दुसर्‍याचे सुख पाहून स्वत:ची जळफळाट करवून घेतो, अस्वस्थ होतो. आपण सोडून इतर सगळे कसे सुखी आहेत असेच आपल्याला वाटत राहते आणि त्या विचाराने आपण आणखी दुःखी होतो! या दुःखाचे मूळ नष्ट करायचे असेल तर पुढे दिलेली गोष्ट वाचा आणि कायम लक्षात ठेवा!

ही गोष्ट आहे एका प्राण्यांच्या बागेतली. त्या बागेत एक चिंतनशील कावळा रोज फेरफटका मारतो. दुसऱ्यांना पाहता आपल्या काळ्या रंगाकडे बघत सतत स्वतःचा दुःस्वास करतो. अशा वेळी त्याला तलावात पोहणारा पांढरा शुभ्र राजहंस त्याला खुणावतो. मात्र आपल्या काळ्या रंगामुळे आणि कर्कश आवाजामुळे कोणी आपल्याशी बोलेल याची त्याला खात्री वाटत नाही.

तरीसुद्धा एक दिवस तो धाडस करून राजहंसाला हाक मारतो. त्याचे कौतुक करतो. रूपाचे गोडवे गातो. ते ऐकून राजहंस सुखावतो आणि म्हणतो, माझा पांढरा शुभ्र रंग लोकांना खुणावतोच पण मला तो हिरवागार पोपट आवडतो. किती छान लाल चुटुक चोच आहे त्याची. शिवाय गोड गोड बोलून सगळ्यांचे मन जिंकतो. राजहंसाचे बोलणे ऐकून कावळ्याला पोपटाचा हेवा वाटला. तो उडत उडत त्याच्या पिंजऱ्याजवळ गेला. त्याचे कौतुक केले. पोपटाने मिठू मिठू करत आभार मानले व म्हणाला, ‘कावळे दादा, माझा पोपटी रंग छान आहेच, पण मी मोराचा रंगीत पिसारा पाहतो ना, तेव्हा आपल्याला दोनच रंग का मिळाले याचे वैषम्य वाटते.

कावळ्याला वाटले याचा अर्थ मोरच सर्वात सुखी आनंदी असेल, त्यामुळे एकदा त्याची भेट घेऊ. असे म्हणत कावळ्याने मोराची भेट घेतली. मोर आपले कौतुक ऐकून मोहरून गेला. त्याने आपला पसारा फुलवला. ते सुंदर रंग बघून कावळा हरखून गेला. ते बघत असताना कावळा म्हणाला, मोरा तू सर्वात सुंदर आणि सुखी आहेस, नाहीतर मला बघ, मला देवाने एकच रंग लावून पाठवला, निदान पुढचा जन्म तरी मोराचा मिळावा. हे ऐकून मोर हसून म्हणाला, अरे सुंदर दिसण्याचे फायदे असतात तसे तोटेही असतात, आज हेच सौंदर्य लोकांना बघता यावं म्हणून मला पिंजऱ्यात ठेवले आहे. माझे आयुष्य चौकटीत बांधले गेले आहे. अशा वेळी उलट तुझ्या आयुष्याचा हेवा वाटतो, तू म्हणतोस की तुझ्याकडे कोणी बघत नाही, पण म्हणूनच की काय तू स्वच्छंद आयुष्य जगू शकतोयस. त्याचा आस्वाद घे!’

हे ऐकल्यापासून कावळ्याला स्वतःबद्दल प्रेम वाटू लागले आणि तो आपल्या आयुष्याचा भरभरून आनंद घेऊ लागला!

तात्पर्य : आपण माणसंही असेच प्राण्यांसारखे दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करत बसतो, त्यापेक्षा आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानायला शिकलो तर आपल्यालाही स्वतःबद्दल हेवा वाटू लागेल हे नक्की!

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page