
मंडणगड/प्रतिनिधी : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, अर्थशास्त्र विभाग, वाणिज्य विभाग आणि भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) व राश्ट्रीय रोखे बाजार संस्था (NISM) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘अर्थसाक्षरता व भांडवल बाजारातील करिअर’ या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी प्रमुख व सेबीचे तज्ज्ञ प्रशिक्षक प्रा. डॉ. विजय ककडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते. याप्रसंगी उपप्रचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. रामदास देवरे, प्रा. संजयकुमार इंगोले, डॉ. विनोदकुमार चव्हाण, डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे षाल, पुस्तक व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. भरतकुमार सोलापुरे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विजय ककडे यांनी सेबी व एनआयएसएम या संस्थांची स्थापना, त्यांचे कार्य आणि महत्त्व सांगून या संस्थांच्या स्थापनेनंतर भांडवल बाजारातील गैरप्रकार कमी होत गेले आणि एनआयएसएममुळे अर्थ साक्षरता आणि गुंतवणूक जागरुकता वाढल्याचे स्पष्ट केले. या प्रसंगी त्यांनी प्राथमिक व दुय्यम भागबाजार, त्यांच्यातील फरक आणि जोखीम सविस्तरपणे विशद केले. भाग बाजारातील गुंतवणूक म्हणजे जुगार नसून डोळसपणे गुंतवणूक केल्यास नक्कीच लाभ होतो असे सांगितले. यासंदर्भात गैरप्रकार कसे होतात, ते टाळायचे कसे आणि खबरदारी कशी घ्यायची हे सविस्तरपणे सांगितले. एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून रोखे बाजारात विद्यार्थ्याना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि त्या संधीसाठी एनआयएसएम मार्फत प्रमाणपत्र व पदवीचे राबवले जाणारे अभ्यासक्रम यांचीही सविस्तर माहिती त्यांनी दिली.
प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी सांगितले की, शेअर बाजारामध्ये मोठी जोखीम आहे पण अभ्यास करुन गुंतवणूक केल्यास विद्यार्थ्याना याचा निश्चितच फायदा होईल. तसेच कौटुंबिक उत्पन्न, खर्च व बचतीचे विश्लेषण करताना आधी निश्चित अशी रक्कम बचत करुन उर्वरित रक्कम खर्च करण्याचे महत्त्व सांगितले. बचतीची गुंतवणूक करताना उपलब्ध असणारे अनेक पर्याय स्पष्ट केले. गेल्या तीस वर्षाचा विचार करता इतर कोणत्याही गुंतवणूकीपेक्षा शेअर्स गुंतवकीपासून सर्वाधिक परतावा मिळाल्याचे त्यांनी उदाहरणासह सांगितले. या प्रशिक्षणामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. तसेच या शिबिरामध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिबिराचे सूत्रसंचालन डॉ. वाल्मिक परहर यांनी केले तर शेवटी आभार डॉ. रामदास देवरे यांनी मानले.